आरक्षणाच्या लढ्यात तेली समाजाची उडी
By Admin | Updated: August 9, 2014 23:33 IST2014-08-09T23:33:53+5:302014-08-09T23:33:53+5:30
मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन छेडले असतानाच आता तेली समाजानेही त्यात उडी घेऊन ८ टक्के आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.

आरक्षणाच्या लढ्यात तेली समाजाची उडी
लाखनी : मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन छेडले असतानाच आता तेली समाजानेही त्यात उडी घेऊन ८ टक्के आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
राज्य शासनाने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केले. त्यामुळे धनगर समाजाने मोर्चा, उपोषण, रस्ता रोको व बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला आदिवासी समाजाने विरोध केला आहे.
धनगर व आदिवासींमधील संघर्ष पेटला असतानाच तेली समाजानेही ८ टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. ३६२ जातींचा समावेश असलेल्या ओबीसी प्रवर्गासाठी राज्यात २७ टक्के आरक्षण असून यात अनेक जातींना न्याय मिळत नाही. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी २७ टक्के लोकसंख्या तेली समाजाची असल्याने तेली समाजाला ८ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. अलिकडे आरक्षणावर अनेकांचा डोळा आहे. आरक्षण हे मागासवर्गीय व अविकसित जातीकरीता लागू करण्यात येते. ज्या घटकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास झाला नाही अशांना समाजाच्या प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्याची तरतूद आहे. परंतु मतांचे राजकारण करीत असलेल्या राज्यकर्त्यांनी आरक्षणाचा बाजार मांडला आहे. वर्षानुवर्षपासून सत्तेत राहून आर्थिक, सामाजिक, व शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झालेल्या समाजाला केवळ बेरजेच्या राजकारणासाठी म्हणून आरक्षण दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात मागास घटकांसमोर अंधकारमय परिस्थिती निर्माण होणार आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला १५ टक्के आरक्षण दिले आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी तेली समाजाची संख्या २७ टक्के आहे. बोटावर मोजण्याइतके आमदार तेली समाजाचे निवडून आले आहे. यामुळे तेली समाजाला अपेक्षित विकास साधता आला नाही. या समाजाचा जीवनस्तर खालावला आहे. शेती, मजुरी, केवळ पोट भरता येईल असा छोटासा व्यवसाय यापुरता तेली समाज मर्यादित राहिला आहे. ओबीसी प्रवर्गात ३६२ जाती आहेत. तेली समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत ८ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. तेली समाजाला पुरेसे आरक्षण देण्याची मागणी तेली समाज संघटनेने केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)