टेकाम, रहांगडाले, बुरडे, डहारे यांची वर्णी
By Admin | Updated: July 29, 2015 00:31 IST2015-07-29T00:31:08+5:302015-07-29T00:31:08+5:30
जिल्हा परिषद विषय समितीची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वाट्याला समसमान पदांचे वाटप

टेकाम, रहांगडाले, बुरडे, डहारे यांची वर्णी
भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आज मंगळवारला विषय समितीच्या निवडणुकीतही प्रत्येकी दोन जागांवर सभापतिपद निवडून आम्ही एक असल्याचा संदेश दिला.
विषय समितीच्या निवडणुकीत समाज कल्याण सभापतिपदी काँग्रेसचे नीळकंठ टेकाम यांची तर महिला बाल कल्याण सभापतिपदी राष्ट्रवादीच्या शुंभागी रहांगडाले या विजयी झाल्या. अन्य दोन सभापतिपदासाठी काँग्रेसचे विनायक बुरडे आणि राष्ट्रवादीचे नरेश डहारे यांची वर्णी लागली. ३९ विरुद्ध १३ या फरकाने चारही विषय समितीच्या निवडणुकीत उमेदवारांना मते मिळाली.
५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत काँग्रेस १९, राष्ट्रवादी काँग्रेस १५, भाजप १३, चार अपक्ष आणि शिवसेना एक असे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस-भाजप अशी युती असल्यामुळे काँग्रेसने तीन जागांवर दावा केला होता. यावर समाधानकारक तोडगा काढून प्रत्येकी दोन पदे विभागून घेण्यात आले.
पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विजय उरकुडे यांच्या अध्यक्षतेत दुपारी ३ वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहिल्यांदा समाज कल्याण समितीची निवडणूक घेण्यात आली. यात सभापतिपदासाठी काँग्रेसचे नीळकंठ टेकाम, रमेश डोंगरे, रेखा वासनिक तर भाजपचे नेपाल रंगारी यांनी नामांकन दाखल केले. डोंगरे व वासनिक यांनी नामांकन परत घेतल्यानंतर टेकाम आणि रंगारी यांच्यात निवडणूक झाली. यात काँग्रेसचे नीळकंठ टेकाम विजयी झाले. त्यानंतर महिला व बाल कल्याण समितीची निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी काँग्रेसच्या चित्रा सावरबांधे, प्रणाली ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुभांगी रहांगडाले, भाजपच्या माधुरी हुकरे यांनी नामांकन दाखल केले. सावरबांधे व ठाकरे यांनी नामांकन परत घेतल्यानंतर रहांगडाले व हुकरे यांच्यात निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुभांगी रहांगडाले विजयी झाल्या.
ऊर्वरित दोन सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून विनायक बुरडे, होमराज कापगते, प्यारेलाल वाघमारे, मनोहर राऊत, चित्रा सावरबांधे, नीळकंठ कायते, राष्ट्रवादीकडून नरेश डहारे, भाजपकडून संदीप ताले, रामराव कारेमारे यांनी नामांकन दाखल केले होते. यात काँग्रेसचे विनायक बुरडे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश डहारे हे निवडून आले.
कॉग्रेसच्या सदस्यांना मिळणार सव्वा वर्षाने संधी
विषय समितीची निवडणूक पार पडल्यानंतर अध्यक्षांच्या कक्षात आयोजित पत्रपरिषदेत काँग्रेसचे निरिक्षक तानाजी वनवे म्हणाले, पदे कमी आणि सदस्य जास्त असल्यामुळे सव्वा-सव्वा वर्षाचे पद देण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे. साकोली व भंडारा तालुक्याला पद न मिळाल्यामुळे सव्वा वर्षानंतर या तालुक्यांना पदे देऊन नाराजी दूर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
पत्रपरिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष जीया पटेल, माजी आमदार सेवक वाघाये, महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रमिला कुटे, नवनियुक्त सभापती विनायक बुरडे यांच्यासह कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
याच पत्रपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल म्हणाले, आमचे सभापतीपद अडीच वर्षांसाठी कायम राहणार असल्याचे स्पष्ट करुन निवडून आलेल्या तालुक्यांना न्याय दिल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)