तहसील व पंचायत समिती बांधकामाचा मुद्दा गाजणार
By Admin | Updated: December 3, 2014 22:45 IST2014-12-03T22:45:24+5:302014-12-03T22:45:24+5:30
येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या नवीन ईमारतीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असून यासंबंधात आवश्यक ती कागदपत्रे ग्रा.पं. सदस्य हेमंत भारद्वाज, आरपीआयचे कैलास गेडाम

तहसील व पंचायत समिती बांधकामाचा मुद्दा गाजणार
साकोली : येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या नवीन ईमारतीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असून यासंबंधात आवश्यक ती कागदपत्रे ग्रा.पं. सदस्य हेमंत भारद्वाज, आरपीआयचे कैलास गेडाम व काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष मार्तंड भेंडारकर यांनी काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार, तत्कालीन तहसीलदार यांनी साकोली तहसील कार्यालयाची नवीन इमारत गडकुंभली रोडवरील गटक्रमांक ३२४/२४० वर करण्याचे निश्चित केले. मात्र सदर ठिकाण हे नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. तहसील कार्यालय परिसरात पोलीस स्टेशन, न्यायमंदीर, उपजिल्हा रुग्णालय, पोस्ट आॅफिस, लघुपाटबंधारे विभाग, एमईसीबी यासारखे कार्यालय आहेत. सुरू असलेले बांधकाम ग्रामपंचायत सदस्य हेमंत भारद्वाज यांनी बंद पाडले होते. मात्र खा. नाना पटोले व आ. राजेश काशीवार यांनी हे काम पुर्ववत सुरू करण्यात अधिकाऱ्यांना भाग पाडले. ते काम पुन्हा सुरू करण्यात आले. या प्रकारामुळे ईतर पक्षाचे पुढारी एकत्र आले असून संयुक्तरित्या जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहे. दि.९ ला सर्वपक्षीय साकोली बंद व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे साकोली पंचायत समिती व तहसील कार्यालयाची नवीन ईमारत जुन्याच ठिकाणी तयार करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, हेमंत भारद्वाज, भारतीय कम्युनिष्ठ पार्टीचे शिवकुमार गणवीर, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मार्तंड भेंडारकर, आरपीआयचे कैलास गेडाम व रिपब्लिकन सेनेचे अचल मेश्राम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.(तालुका प्रतिनिधी)