तांत्रिक अधिकाऱ्यांकडून रोहयो कामात हयगय
By Admin | Updated: May 21, 2015 00:36 IST2015-05-21T00:36:32+5:302015-05-21T00:36:32+5:30
शासन जनहितार्थ अनेक कल्याणकारी योजनांची निर्मिती करते पण क्रियान्वयन यंत्रणेतील अधिकारीच स्वार्थासाठी ...

तांत्रिक अधिकाऱ्यांकडून रोहयो कामात हयगय
लाखनी : शासन जनहितार्थ अनेक कल्याणकारी योजनांची निर्मिती करते पण क्रियान्वयन यंत्रणेतील अधिकारीच स्वार्थासाठी ग्रामपंचायत समितीवर दबाव आणून शासनाने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशाला तिलांजली देत असल्याचे प्रकार तालुक्यात घडून येत आहेत.
ग्रामपंचायतीच्या नावाने पंचायत समितिच्या मग्रारोहयो विभागातील काही तांत्रिक अधिकाऱ्यांनीच कंत्राटदारीचा गोरखधंदा सुरू केल्याचे निर्देशनास येत आहे. यामुळे अंदाजपत्रकात साहित्याच्या किमती वाढविल्या जात असून त्याचा भार शासकीय तिजोरीवर पडत आहे.
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील गरीब कुटूंबातील एका व्यक्तीस वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, मजुरांची आर्थिक सबलीकरणासोबत ग्रामीण भागाचा विकास व्हावा, काही अंशी बेरोजगारीवर मात करता यावी, याकरिता केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाद्वारे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेस सुरूवात केली. राज्यात ही योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने सुरू आहे. यात ६० टक्के मजुरप्रधान कामे व ४० टक्क्यापेक्षा सिमेंट कांक्रीट रस्ता, नाली, पानवठा, खडीकरण व मुरूम पसरविणे अशा कुशल कामाचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामविकासाचे उद्दिष्ट असल्याने गावाच्या आवश्यकतेनुसार ग्रामसेवकांच्या माध्यमाने मजूर प्रधान कामे सुचविण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस दिलेले आहेत.
ग्रामपंचायतीनी सुचविलेल्या अकुशल व कुशल कामाचे तालुकास्तरीय नियोजन करणे कामाचे अंदाजपत्रक तयार करणे व मंजुर कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज खंडविकास अधिकाऱ्यांना उपलब्ध दस्तऐवज खंडविकास अधिकाऱ्यांना उपलब्ध करणे, मजुरांचे हजेरीपत्रक व झालेल्या कामाचे मोजमाप करून मजुर पगार काढण्यासाठी पंचायत समितीचे अधिनस्त स्वतंत्र महाराष्ट्र रोजगार हमी योजना विभागाची स्थापना करण्यासाठी कंत्राटी तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य मानधनावर ते सेवा देत असतात. खरीप व रब्बी हंगाम संपल्यानंतर मग्रारोहयोची अकुशल कामांना सुरूवात केली जाते. तालुक्याचा संपूर्ण कामांचा रेकॉर्ड या कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्याकडे असल्याने कोणत्या ग्रामपंचायतीत अकुशल कामे पूर्ण झाली आहेत. याची माहिती असते.
मजुरप्रधान कामे पूर्ण झालेल्या गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच व सदस्यांशी स्वत: किंवा आपल्या हस्तकामार्फत संपर्क साधून तांत्रिक अधिकारी ठरावाची मागणी करतात. अंदाजपत्रक तयार करताना तांत्रिक अधिकारी शासनाचे नियम पायदळी तुडवून स्वत:चे स्वार्थ जोपासण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्यावर वचक निर्माण होणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने एमआरईजीएसचे कामे नियमानुसार पूर्ण केली जातात.
- हेमंत मेहर,
संवर्ग विकास अधिकारी लाखनी.