देव्हाडीच्या उड्डाणपुलामध्ये तांत्रिक बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:17 IST2019-08-02T22:16:10+5:302019-08-02T22:17:01+5:30
देव्हाडी येथील उड्डाणपूल काटकोनमध्ये नसल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. पूल भरावातील राख पाण्यासह सतत वाहून जात आहे. गत चार वर्षापासून पुलातून राख वाहून गेली. त्यामुळे पूलावर भगदाड पडले होते.

देव्हाडीच्या उड्डाणपुलामध्ये तांत्रिक बिघाड
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपूल काटकोनमध्ये नसल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. पूल भरावातील राख पाण्यासह सतत वाहून जात आहे. गत चार वर्षापासून पुलातून राख वाहून गेली. त्यामुळे पूलावर भगदाड पडले होते. लहान खड्डेही येथे पडणे सुरु झाले आहे. पोकळी भरुन काढण्याकरिता वायब्रेटरचा उपयोग करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. संपूर्ण तांत्रिक बिघाड दूर होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यतेतून देव्हाडी येथील उड्डाणपूल बांधकाम सुरु आहे. २४ कोटींचा हा उड्डाणपूल आहे. मनसर- तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महार्माचा दर्जा सदर रस्त्याला मिळाला आहे. सदर रस्ता चोवीस तास वर्दळीचा आहे. तुमसरकडील उड्डाणपूल पोचमार्ग काटकोनात नसल्याने पूलातून मोठ्या प्रमाणात राख वाहून गेली. याच बाजूला मोठा भगदाड पडला होता.
पुलाच्या दोन्ही बाजूला दगडांना घट्ट पकडण्याकरिता बेल्टचा वापर करण्यात आला आहे. बेल्ट दोन्ही दगडांना पकडून ठेवत आहे. दरम्यान पूल भरावातील राख अतिशय गुळगुळीत आहे. दगडातील फटीतून ही राख वाहत आहे. पूलात पाणी शिरण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. काटकोनात पूल नसल्याची माहिती येथे पुढे आली आहे. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानेच पूलावर भगदाड व खड्डे पडणे सुरु झाले आहे.याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
देव्हाडी उड्डाणपूलात भरावात घातलेली राख तिरोडा येथील वीज कारखान्यातील रासायनिक फलाय अॅश आहे. सदर उघड्या राखेवर तिन्ही ऋुतूचा परिणाम होतो. ही राख वापरण्याची परवानगी बांधकाम विभागाने दिली आहे. संबंधित अधिकारी याकडे वायब्रेटरचा वापर करुन राखेला दाबण्याचे सांगत आहेत. सुरुवातीपासूनच सदर पूल चर्चेत आहे, पंरतु आजपर्यंत तज्ज्ञाचे पथक येथे आले नाही. केवळ संबंधित खात्याचे वरिष्ठ स्थापत्य अभियंते येथे पाहणी करुन जात आहेत.
बांधकामाची गुणवत्ता कमी की तांत्रीक बिघाड
उड्डाणपूलाचे बांधकामात सिमेंट दगडांचा वापर करण्यात आला आहे. येथे बांधकामाची गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आहे की तांत्रिक बिघाड याचा खुलासा केवळ संबंधित विषयाचे तज्ज्ञच करु शकतात. राज्य शासनाने पूलाबाबत गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश येथे देण्याची गरज आहे.