‘ते’ शिक्षक अडकले नियमांच्या कचाट्यात

By Admin | Updated: May 12, 2017 01:49 IST2017-05-12T01:49:24+5:302017-05-12T01:49:24+5:30

याच मातीत लहानाचा मोठा झालो, ईथल्याच शाळेत शिकलो, परंतु नोकरी दुसऱ्या जिल्ह्यात मिळाली.

The teachers' teacher stuck in the jurisdiction | ‘ते’ शिक्षक अडकले नियमांच्या कचाट्यात

‘ते’ शिक्षक अडकले नियमांच्या कचाट्यात

प्रकरण आंतरजिल्हा बदलीचे : बदलीच्या आदेशाने झालेला आनंद क्षणात विरला
नंदू परसावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : याच मातीत लहानाचा मोठा झालो, ईथल्याच शाळेत शिकलो, परंतु नोकरी दुसऱ्या जिल्ह्यात मिळाली. कधीतरी स्वत:च्या जिल्ह्यात बदली होईल, आयुष्याच्या शेवटची वर्षे आपल्या मातीत सेवा करता येईल, अशी अपेक्षा होती. परंतु अख्खे आयुष्य कुटुंबापासून दूर राहून परजिल्ह्यात सेवा बजावल्यानंतरही स्वजिल्ह्यात येताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची खंत या शिक्षकांना आहे. आंतरजिल्हा बदली होऊन रूजू झालेल्या आणि आठच दिवसात बदली रद्द झालेल्या शिक्षकांचा हा आनंद क्षणिक ठरला.
प्रारंभी नोकरीच्या पदस्थापनेनंतर काही शिक्षकांनी १५, काहींनी २० तर काहींनी २४ वर्षे सेवा परजिल्ह्यात बजावली. आता नोकरीच्या शेवटच्या काळात तरी स्वजिल्ह्यात बदली होत असताना या शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. परंतु आता स्वजिल्ह्यात बदली झाल्यानंतर पदस्थापनेच्या गावातून कार्यमुक्त केले. आता स्वजिल्ह्यातही रूजू करून घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्यामुळे या शिक्षकांवर द्धिधा संकट ओढवले आहे.
साकोली तालुक्यातील खंडाळा (बोंडे) येथील मूळ रहिवाशी असलेले सुरेश गडपायले यांना १९८२ मध्ये नांदेड जिल्ह्यात पदस्थापना मिळाली. सेवेला २४ वर्षे झाले असताना दोन वर्षे नोकरीची शिल्लक असताना आंतरजिल्हा बदली होऊन मोहाडी तालुक्यात आठ दिवसांपूर्वी रूजू झाले. त्यातच विभागीय आयुक्तांच्या पत्राचा आधार घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या बदल्या रद्द ठरविल्या. त्यामुळे आता जायचे कुठे असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
साखरा येथील प्रभु धारगावे यांची सेवा केवळ दोन वर्षे शिल्लक आहे. त्यांचे अख्खे आयुष्य नांदेड जिल्ह्यात सेवेत गेले. मुळचे पालांदूर येथील अरविंद बारई हे २००३ मध्ये नांदेड जिल्ह्यात रूजू झाले. २००८ मध्ये त्यांनी बदलीचा प्रस्ताव सादर केला. १४ वर्षाच्या सेवेनंतर आणि ९ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर त्यांची पवनी तालुक्यातील आकोट येथे बदली झाली. २९ एप्रिलला रूजू झाले आणि आठच दिवसात कार्यमुक्त करण्यात आले. भावड येथील मोरेश्वर गायधने १९९७ मध्ये नांदेडमध्ये रूजू झाले. २० वर्षाच्या सेवेनंतर तुमसरात रूजू झाले. आठ दिवसात परत पाठविण्यात आले. किन्ही (मोखे) येथील मंगलदास उंदीरवाडे हे १९९८ मध्ये जालना येथे रूजू झाले. १९ वर्षांच्या सेवेनंतर १६ मार्चला पवनी पंचायत समितीत रूजू झाले होते. वरठी येथील धनराज फुले यांचे तर सेवानिवृत्तीसाठी केवळ तीन वर्षे शिल्लक आहेत. आठ दिवसांपूर्वी तुमसर पंचायत समितीत ते रूजू झाले होते. परंतु आयुक्तांच्या पत्राचा आधार घेत पात्र-अपात्र हा फरक लक्षात न घेता त्यांना सरसकट बदल्या ठरविण्यात आल्यामुळे त्यांच्या संकट ओढवले आहे.

मुलांच्या प्रवेशाचे कसे होणार ?
परजिल्ह्यात १५ ते २० वर्षे सेवा बजावल्यानंतर भंडारा जिल्ह्यात बदली झाल्यामुळे हे शिक्षक सामान घेऊन आले. मुलांचे शाळेतून नाव काढले. त्यांचे नाव भंडारा जिल्ह्यातील शाळेत दाखल केले. आता बदली रद्द झाल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी शिकवायचे कुठे असा प्रश्न या शिक्षकांना पडला आहे. ज्या ठिकाणाहून हे शिक्षक आले आहेत, तिथे कार्यमुक्त केल्यामुळे तेथील प्रशासना पुन्हा रूजू करून घेतील का? प्रश्नाने त्यांच्या मनात काहूर माजला आहे.
चूक प्रशासनाची, फटका शिक्षकांना
ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून दोन्ही जिल्हा परिषदांनी म्हणजेच कार्यरत असलेल्या व बदलीने जाण्यासाठी इच्छूक असलेल्या शिक्षकांना ज्या जिल्हा परिषदांनी ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. अशाच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून कार्यमुक्तीचे आदेश १५ एप्रिल रोजी काढण्यात यावे, असे अवर सचिवांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. परंतु भंडारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नव्याने आॅनलाईन अर्ज करण्यासाठी निर्देश दिल्यामुळे या शिक्षकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पटोले-फुके शिक्षकांच्या मदतीसाठी
सर्व या अन्यायग्रस्त शिक्षक मूळचे भंडारा जिल्ह्यातील असल्यामुळे या शिक्षकांनी खासदार नाना पटोले आणि आमदार डॉ.परिणय फुके यांना न्यायासाठी साकडे घातले. परिणय फुके यांनी रविवारला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी यांच्याशी चर्चा करून शिक्षकांवर अन्याय होऊ देऊ नका, अशी विनंती केली. दरम्यान गुरूवारला हाच प्रश्न घेऊन खासदार नाना पटोले हे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात भेट घेऊन आंतरजिल्हा बदली शिक्षकांचा मुद्दा उपस्थित केला. चर्चेनंतर एकाही शिक्षकाला अस्थिर ठेवणार नाही. सर्वच शिक्षकांना भंडारा जिल्हा परिषदेत रूजू करून घेण्यात येईल अशी ग्वाही दिल्यानंतर शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.
तत्कालीन सीईओ कारणीभूत
११७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी या बदल्या करण्यासाठी उत्सुकता दाखविली. या बदली प्रकरणात मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण झाल्याचा आरोप झाला होता. परंतु ११७ बदल्यांमध्ये तक्रारकर्ते ज्ञानेश्वर दिपटे यांच्यावर अन्याय झाल्यामुळे सरसकट बदली रद्दचे आदेश धडकले.

Web Title: The teachers' teacher stuck in the jurisdiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.