आता शिक्षकांची ‘शीला, मुन्नी’ बदनाम होणार!
By Admin | Updated: August 12, 2015 00:31 IST2015-08-12T00:31:19+5:302015-08-12T00:31:19+5:30
शाळा परिसरात खणखणणाऱ्या शिक्षकांच्या मोबाईलवर शिक्षण विभागाने बंदी घातली होती.

आता शिक्षकांची ‘शीला, मुन्नी’ बदनाम होणार!
मोबाईल बंदी उठवली : शाळेत वाजणार वेगवेगळ्या रिंगटोन्स्, मुख्याध्यापकांवर राहणार जबाबदारी
प्रशांत देसाई भंडारा
शाळा परिसरात खणखणणाऱ्या शिक्षकांच्या मोबाईलवर शिक्षण विभागाने बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठविल्याने अनेक शिक्षकांच्या मोबाईलवर विद्यार्जनादरम्यान ‘शीला की जवानी, मुन्नी बदनाम हो गयी, बत्तमीज दिल’ यासारखे रिंगटोन्स् ऐकायला मिळाल्यास नवल वाटायला नको.
शहरी तथा ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षक विद्यार्जनादरम्यान त्यांच्याकडील मोबाईल ‘सायलेंट’ मोडवर ठेवत नव्हते. त्यामुळे वर्गावरील शिक्षकाला कुणाचा मोबाईल आल्यास त्यातील रिंगटोन्स् खणखणत असे. अनेकदा शिक्षकांची अश्लिलतेचा कळस गाठणारे रिंगटोन्स् विद्यार्थिनींसाठी लज्जास्पद वाटायचे. शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांची आध्यात्माची जोड असायला हवी मात्र, विविध चित्रपटातील गाजलेली गाणी किंवा संवादावर आधारित रिंगटोन्स् असतात.
अपवादात्मक शिक्षकांचे मोबाईल सोडल्यास अनेकांचा मोबाईलच्या रिंगटोन्स्चा आवाज मोठा ठेवण्यावर भर असतो. त्यामुळे वर्गात असो किंवा शिक्षक-शिक्षकांसह बसलेल्या एखाद्या शिक्षकाला कुणाचा फोन आल्यास हमखास, ‘शिला की जवानी, मुन्नी बदनाम हुयी, चोली के पिछे क्या है, बत्तमीज दिल माने ना’ यासारखे अश्लिलता पसरविणारे व लज्जास्पद रिंगटोन्स्ने वाजल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. यामुळे शिकवीणे सोडून हे शिक्षक महाशय वर्ग संपेपर्यंत मोबाईलवर बोलत रहायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात एकप्रकारे अडथळा निर्माण होत होता.
या प्रकाराच्या तक्रारी वाढत गेल्यामुळे शिक्षण विभागाने १८ फेब्रुवारी २००९ च्या शासन निर्णयानुसार शालेय परिसरात मोबाईल वापरण्यावर बंदी घालून शिक्षकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली होती. मात्र, शिक्षण विभागाचे उपसचिव रा. ग. गुंजाळ यांनी बंदी उठविण्याचे परिपत्रक जारी केले आहे. सदर परिपत्रक २८ मे २०१५ रोजी घेतलेल्या निर्णयावरून काढण्यात आले आहे.
या परिपत्रकानुसार प्राथमिक, माध्यमिक अशा सर्वच शासकीय व खासगी शाळांतील शिक्षकांना वर्गखोलीतही मोबाईल वापरता येणार आहे. मात्र, वैयक्तिक कामांसाठी शिक्षकांनी मोबाईल वापरू नये, असे निर्देश आहेत. मोबाईलवरील बंदी उठविण्यात आल्याने शाळा परिसरात बंद असलेल्या मोबाईलवरी ‘शिला की जवानी, मुन्नी बदनाम हुयी’ अशी गाणे पुन्हा वाजू लागतील की, काय अशी भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
स्मार्टफोनची क्रेझ आता गावखेड्यापर्यंत पोहचली असल्याने सर्वांच्याच हातात महागडा स्मार्टफोन बघायला मिळत आहे. यामध्ये तासन्तास् डोके घालून असणाऱ्या युवक-युवतींसह शासकीय कर्मचारीही चॉटींग, व्हॉटस्अप, फेसबुकवर असल्याचे दिसून येतात. यात शिक्षकही मागे नाही. मोबाईल बंदी उठविल्याने शिक्षक विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी साधणार याकडे पालकांच्या नजरा लागल्या आहेत.
शिक्षकांनी वर्गात मोबाईल वापरु नये, वापरल्यास ते सायलेंस मोडवर ठेवावे. विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियमभंग करू नये. शिक्षकांच्या मोबाईल वापरण्यावर बंदी नव्हती. मात्र त्यांनी वर्गात मोबाईल वापरु नये, असा नियम होता. नव्या नियमानुसार मोबाईल वापरण्यावर मुख्याध्यापक व तपासणी अधिकारी देखरेख ठेवणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होईल.
- किसन शेंडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, भंडारा.
निर्णयात दुजाभाव
शिक्षकांना मोबाईल वापरण्यावर असलेली बंदी उठविण्यात आली असली, तरी विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयात दुजाभाव असल्याची ओरड आहे.