शालेय पोषण आहार माहितीसाठी शिक्षकांची ‘परीक्षा’
By Admin | Updated: July 21, 2016 00:27 IST2016-07-21T00:27:08+5:302016-07-21T00:27:08+5:30
शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत पोषण आहार पुरवठा करण्यात येतो.

शालेय पोषण आहार माहितीसाठी शिक्षकांची ‘परीक्षा’
आॅनलाईनचा अडथळा : माहिती न भरल्यास अनुदानाला मुकावे लागणार
भंडारा : शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत पोषण आहार पुरवठा करण्यात येतो. या शैक्षणिक सत्रापासून राज्यभरात शिक्षकांना शालेय पोषण आहाराची माहिती आॅनलाईन भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र अनेक शाळांमध्ये संगणक आहे तर इंटरनेट नाही, जिथे संगणक व इंटरनेट आहे तेथील शिक्षकांना संगणक हाताळण्याचे ज्ञान नसल्याने आहाराची माहिती आॅनलाईन भरण्यासाठी शिक्षकांची परीक्षाच सुरू झालेली आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मागील वर्षीपर्यंतचा शालेय पोषण आहाराबाबतचा अनुभव किंवा तक्रारी बघता, यावर्षी पोषण आहाराच्या अनुदानाबाबत पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
याअनुषंगाने, शिक्षण विभागाने यावर्षीचे नविन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच राज्यभरातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांसाठी शालेय पोषण आहारची माहिती संगणकावर आॅनलाईन भरण्याचे आदेश बजावले आहे.
अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक आहेत. परंतु आजही अनेक शिक्षकांना संगणक हाताळता येत नाही. तर अनेक शाळांमध्ये संगणक असूनही इंटरनेटची सुविधा नसल्याने आॅनलाईन माहिती भरताना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. ग्रामीण क्षेत्रातील अनेक शाळांमध्ये विद्युत पुरवठा नाही नसल्याने अनेक ठिकाणी संगणक नाहीत.
त्यामुळे आॅनलाईन माहिती भरण्यासाठी शिक्षकांना शाळा सोडून तालुकास्थळी किंवा अन्यत्र जावे लागत आहे. यामुळे शिक्षक शाळेत बराचवेळ अनुपस्थित राहत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर शिक्षकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
हे टाळण्यासाठी आॅनलाईनचा खटाटोप
शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पोषण आहार दररोज मिळेल. जे विद्यार्थी शाळेत अनुपस्थित राहणार त्यांनाच हा पोषण आहार मिळणार आहे. याप्रक्रियेमुळे विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याच्या नावावर पोषण आहार उचलून त्याची अफरातफर करता येणार नाही. या सर्व बाबी टाळण्यासाठी शिक्षण विभागाने आता रोज शालेय पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरण्याच्या सुचना दिल्या आहेत.
शासनाने दिलेल्या निदेशाचे पालन करण्याचे सुचना गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांना दिल्या आहेत. शालेय पोषण आहाराची माहिती दररोज आॅनलाईन शासनाला पाठवावयाची आहे. पोषण आहाराची माहिती अद्ययावत राहिल्यास यात अफरातफर होणार नाही. त्यामुळे सर्व मुख्याध्यापकांनी आॅनलाईन माहिती भरावी.
- किसन शेंडे, शिक्षणाधिकारी, भंडारा.
आहार योजनेची माहिती स्वतंत्र यंत्रणेकडून राबविण्याच्या सुचना आहेत. मात्र यात मुख्याध्यापकांना वेठीस धरण्यात येत आहे. शासनाने गटसाधन केंद्रावर ही माहिती भरण्यासाठी डाटा आॅपरेटर्सची नेमणूक केलेली आहे. त्यांच्याकडून ही माहिती भरण्याची व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष. महा. राज्य. प्राथ. शिक्षक संघ. भंडारा.