शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांचा एल्गार
By Admin | Updated: August 10, 2016 00:18 IST2016-08-10T00:18:20+5:302016-08-10T00:18:20+5:30
शिक्षण विभागाच्या शिक्षकांसह अविभाज्य घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांचा एल्गार
मागण्या प्रलंबित : उपशिक्षणाधिकारी यांना निवदेन
भंडारा : शिक्षण विभागाच्या शिक्षकांसह अविभाज्य घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत सोमवारला शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपशिक्षणाधिकारी (माध्य.) यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आकृतीबंधाबाबत नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेला अहवाल मंजूर करून शिक्षकांच्या भरतीस परवानगी द्यावी, राज्य शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणे माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षानंतर पहिला व दुसरा लाभ लागू करावा, राज्यातील शिक्षकेत्तरांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना मान्यता देण्यात याव्या. शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर कराव्या, १३ जुलै २०१६ च्या अल्पसंख्यांक शाळांबाबतच्या शासन निर्णयानुसार शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरत असल्यास त्यांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर ठिकाणी करावे, शिक्षकेत्तरांना सेवेत असताना शैक्षणिक पात्रता वाढविल्यास त्यास सर्व प्रकारच्या पदांवर वेतन संवर्गासह विनाअट संवर्ग बदलून मिळावा, माध्यमिक शाळामधील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी प्रत्यक्ष होणारा खर्च तथा धुलाई भत्ता नियमित वेतनातून मिळावा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करावी यासह अन्य मागण्यांना घेऊन हे निवेदन देण्यात आले.
भंडारा येथे उपशिक्षणाधिकारी भोंगाडे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष सैनपाल वासनिक, राजेश तितीरमारे, संजय ब्राम्हणकर, श्रीकांत कावळे, ऋषीकेश डोंगरे, राजू निंबार्ते, जे.बी. बांते, बी.एस. निखारे, डी. एस. गजभिये, रतन वंजारी, गंगाधर भदाडे, एस.के. सेलोकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)