स्वाईन फ्ल्यूने शिक्षकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 20, 2015 00:40 IST2015-10-20T00:40:28+5:302015-10-20T00:40:28+5:30
नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका शिक्षकाचा उपचारादरम्यान रविवारी दि. १८ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

स्वाईन फ्ल्यूने शिक्षकाचा मृत्यू
भंडारा : नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका शिक्षकाचा उपचारादरम्यान रविवारी दि. १८ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. सुरेंद्र माधव हुमणे (४७) रा.सिल्ली (हल्ली मुक्काम बेला) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
तुमसर तालुक्यातील करकापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या सुरेंद्र हुमणे या शिक्षकाला दि. ४ आॅक्टोबर रोजी सर्दी, खोकला धरून ताप आल्याने त्यांना भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यांना डबल निमोनिया झाल्याचे सांगितले. मात्र हुमणे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान सुरेंद्र हुमणे यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे उघड झाले. दरम्यान सुरेंद्र हुमणे यांची प्रकृती खालावत गेल्याने शेवटी १५ दिवसांच्या झुंजीनंतर रविवारला मध्यरात्रीदरम्यान सुरेंद्र हुमणे यांची प्राणज्योत मालवली.
आज सोमवारला बेला येथील स्मशानभूमीत सुरेंद्र हुमणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे. स्वाईन फ्ल्युने दगावण्याची ही जिल्ह्यातील तिसरी घटना आहे. तरीही आरोग्य विभाग उदासीन आहे. (प्रतिनिधी)