सकाळच्या प्रार्थनेला शिक्षकांची दांडी
By Admin | Updated: November 22, 2014 22:54 IST2014-11-22T22:54:12+5:302014-11-22T22:54:12+5:30
शनिवार आला किंवा ज्यादिवशी बस उशिरा आली त्यादिवशी बाहेरगावाहून येणाऱ्या शिक्षकाची सकाळच्या प्रार्थनेला दांडी असते. विद्यार्थ्यांना प्रामाणिकता, आदर्शतेचे धडे देणारे गुरुजीच असे नियम तोडत

सकाळच्या प्रार्थनेला शिक्षकांची दांडी
सक्ती गरजेची : न राहताही उचलतात घरभाडे भत्ता
ंसाकोली : शनिवार आला किंवा ज्यादिवशी बस उशिरा आली त्यादिवशी बाहेरगावाहून येणाऱ्या शिक्षकाची सकाळच्या प्रार्थनेला दांडी असते. विद्यार्थ्यांना प्रामाणिकता, आदर्शतेचे धडे देणारे गुरुजीच असे नियम तोडत असतील तर या गुरुजींकडून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय, असा प्रश्न पालकांना पडला आहे. या शिक्षकाबरोबरच पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी हेही मुख्यालयी राहतात का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
साकोली पंचायत समितीचा कारभार सध्या चार ठिकाणी विभागला गेला असल्यामुळे प्रत्येक विभागाची पाहणी करणे, अधिकारी कर्मचारी वेळेवर येतात की नाही, हे तपासणे खंडविकास अधिकारी बोरकर यांनाही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी दौऱ्याच्या नावावर कार्यालयात गैरहजर राहतात.
साकोली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागाच्या अशा संधीचा लाभ शिक्षकही घेत आहेत. साकोली तालुक्यातील बहुतांश गावे ही खेडेविभागातील असून यात बरेच शिक्षक हे मुख्यालयी न राहता साकोली, भंडारा, लाखनी, तुमसर, गोंदिया या ठिकाणी राहून दररोज बसने जाणे येणे करतात.
काही शिक्षक साकोली येथून दुचाकीने संबंधित शाळेत येजा करीत असतात.
ज्या दिवशी बसला उशीर झाला किंवा इतर कारणांमुळे उशीर झाल्यास त्यादिवशी शिक्षकांची सकाळच्या प्रार्थनेला दांडी असते. यातही विशेष म्हणजे शनिवारला सकाळची शाळा असते. या सकाळच्या शाळेला तर बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या गुरुजींची हमखास दांडी असते. (तालुका प्रतिनिधी)