शिक्षकांनो, जीव ओतून विद्यार्थ्यांना घडवा!
By Admin | Updated: January 13, 2016 00:33 IST2016-01-13T00:33:28+5:302016-01-13T00:33:28+5:30
अध्यापन हे पवित्र कार्य असून शिक्षकांनी केवळ व्यवसाय म्हणून पाहू नये. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र साक्षात अस्तित्वात येण्याकरिता शिक्षकांनी शाळेत जीव ओतून शिकवावे, ....

शिक्षकांनो, जीव ओतून विद्यार्थ्यांना घडवा!
जगन्नाथ भोर : सुकळी येथे जिल्हास्तरीय चर्चासत्र
तुमसर : अध्यापन हे पवित्र कार्य असून शिक्षकांनी केवळ व्यवसाय म्हणून पाहू नये. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र साक्षात अस्तित्वात येण्याकरिता शिक्षकांनी शाळेत जीव ओतून शिकवावे, असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत सुकळी (दे.) येथे ज्ञानरचना प्रक्रिया शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शनाच्या जिल्हास्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते.
चर्चासत्राचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून तुमसरचे सभापती कविता बनकर, खंडविकास अधिकारी केशव गड्डापोड, सुकळीचे सरपंच भाऊलाल बांडेबुचे, उपसरपंच भोयर, डायरचे प्राचार्य अभयसिंग परिहार उपस्थित होते.
यावेळी भोर म्हणाले, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ज्ञानरचना प्रक्रिया शैक्षणिक साहित्य निर्मिती अंतर्गत एकही विद्यार्थी अप्रगत राहता कामा नये. विद्यार्थ्यांचे दोन प्रकार असतात. त्यापैकी अप्रगत ‘ढ’ विद्यार्थ्याला प्रगत करण्याचा हे शिक्षकांचे प्रथम उद्दीष्ट आहे. या माध्यमातून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याची जबाबदारी निवड अधिकारी व पालकांची आहे.
शिक्षणाधिकारी के.झेड. शेंडे म्हणाले, भंडारा जिल्ह्यात पाच हजार जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. त्यापैकी एक हजार शिक्षकांनी कवठे येथील शाळेला भेट दिली. जिल्ह्यातील किमान एक बीट प्रगत होणे गरजेचे असून केंद्रातील एक शाळा प्रगत झाली पाहिजे. सन २०१६-१७ मध्ये भंडारा जिल्हा प्रगत करण्याचा संकल्प आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनीही मार्गदर्शन केले. डायटचे प्राचार्य अभयसिंग परिहार यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व प्रगत करण्याकरिता काम करावे लागेल, याचे सादरीकरण केले. जिल्ह्यातील प्रत्येक बीटातील शिक्षकांनी येथे सादरीकरण केले.
चर्चासत्राच्या आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी सी.के. नंदनवार व शिक्षण विस्तार अधिकारी विजय आदमने यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षण साहित्य प्रदर्शन व विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून तयार केलेले साहित्य प्रदर्शनात होते. या चर्चासत्राला भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी राज्याचे प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)