आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचारी वेतनाविना
By Admin | Updated: September 2, 2015 00:28 IST2015-09-02T00:28:49+5:302015-09-02T00:28:49+5:30
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील अनुदानित ...

आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचारी वेतनाविना
उपोषणाचा इशारा : तीन महिन्यांपासून वेतन नाही
भंडारा : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून वेतनाविना आहेत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वेतनासह अन्य मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा ५ सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा अनुदानित आदिवासी आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने दिला आहे.
या आशयाचे निवेदन वरिष्ठ विभागाला देण्यात आले आहे. आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशांतर्गत आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते थांबविल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभटर टक्के असल्याशिवाय कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येवू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले. परिणामी जून, जुलै व आॅगस्ट २०१५ चे वेतन मिळालेले नाही. तसेच कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत वेतन देणे, डीडीओचे अधिकार मुख्याध्यापकांना देणे, दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घेणे, पहारेकरी पदाला मान्यता देवून मानधन देणे, निष्काळजीपणा करणाऱ्या प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणे, दरमहा १ तारखेला वेतन अदा करणे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वरिष्ठश्रेणी लागू करणे, शासकीय आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदानित आदिवासी शाळेतील कर्मचाऱ्यांना सहायक प्रकल्प अधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी या पदावर बढती देणे, कर्मचाऱ्यांना सेवाशर्तीला संरक्षण प्रदान करणे, थकित वेतनबिल- अर्जित रजा व आरोग्यदेयक मंजूर करणे, भविष्य निर्वाह निधी हिशोब विवरणपत्र दोन वर्षांपासून देण्यात आले नाही ते देण्यात यावे, वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण सेवक बाबत मान्यता प्रस्तावात मंजुरी प्रदान करावी यासह एकूण ४२ मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आले आहे.
या आशयाचे निवेदन २१ आॅगस्टला देवरी येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र मागण्यांच्या पूर्ततेवर कानाडोळा करण्यात येत आहे. परिणामी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने दि. ५ सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्याच दिवशी प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जवळपास ५०० कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यात आठ तर गोंदिया जिल्ह्यात २४ अनुदानित आदिवासी आश्रम शाळा आहेत. मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
(प्रतिनिधी)