अनुकंपा नियुक्तीसाठी शिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:21+5:302021-09-08T04:42:21+5:30
०७ लोक ०९ के भंडारा : राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोनासारख्या ...

अनुकंपा नियुक्तीसाठी शिक्षकांचे आंदोलन
०७ लोक ०९ के
भंडारा : राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोनासारख्या जागतिक महामारीत राष्ट्रीय कर्तव्य बजावताना जीव गेले. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धा घोषित करून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. तसेच कुटुंबातील सदस्यांना ५० लाखांचे अनुदान द्यावे या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाने पीडित कुटुंबांतील सदस्यांसोबत ५ सप्टेंबर शिक्षक दिनी नागपूर येथे आंदोलन केले. यावेळी भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांनीही हजेरी लावली होती.
राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता विदर्भातील खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिक शाळा तसेच आश्रम शाळा इत्यादी आस्थापनेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होऊन शिक्षकांचे जीव गेले असून यात नागपूर १७, भंडारा १६, गोंदिया ११, वर्धा १३, चंद्रपूर १५ तर गडचिरोली ४ अशी कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांची संख्या आहे. ही यादी वाढण्यासारखी आहे. याशिवाय यात मृत्यू झालेले अधिकांश शिक्षक हे १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झाल्याने त्यांना जुन्या पेन्शनचा लाभ नाही. त्यामुळे मृत शिक्षकांच्या कुटुंबांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असून कुटुंबातील कमावती व्यक्ती कोरोनासारख्या अकाली आजाराने दगावल्यामुळे
वडिलधाऱ्या मंडळींचे औषधोपचार, कुटुंबाचे संगोपन, शाळकरी मुलांचे शिक्षण, मुलामुलींचे लग्न समारंभ तसेच इतर दैनंदिन गरजा कशा भागवायच्या हा प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.
कोरोनासारख्या महामारीत कर्तव्य बजावताना कोरोना योद्धा म्हणून मृत्यू झालेल्या शिक्षकांबद्दल शासन गंभीर नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी अद्याप मृत्यू झालेल्या शिक्षकांची दखल घेऊन यादीही तयार केली नाही. तर काहींनी नावापुरते आदेश काढले. मात्र, कार्यालयीन अधिकारी यांच्या कामचुकार व उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी पाहिजे तसा शासन स्तरावरून पाठपुरावा होताना दिसत नाही. उलट पीडित कुटुंबाला संस्थेशी हात मिळवणी करून प्रस्तावात अनेक त्रुटी लावून प्रस्ताव परत केल्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप आहे.
त्यामुळे कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान देऊन त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरीत विनाअट सामावून घेण्याच्या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षक दिनी नागपूर येथे आंदोलन करून शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व खासगी प्राथमिक संघांचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर, सचिव विजय नंदनवार, रहेमतुल्ला खान यांनी केले असून लोकपाल चापले, संजय बोरगावकर, मोहन सोमकुवर, ज्ञानेश्वर वाघ, तेजराम राजूरकर, गोपाल मुऱ्हेकर, संदीप सोनवणे, उग्रसेन देऊळकर,ज्ञानेश्वर घंगारे, कुमुद बालपांडे, कल्पना काळबांडे, पवन नेटे, विजय आगरकर, प्रमोद कुंभारे, ज्योती सूर्यवंशी, विद्या मोरे इत्यादी शिक्षक व पीडित कुटुंबातील सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
कोट बॉक्स
कोरोना महामारीचे कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी शिक्षकदिनी आंदोलन करावे लागते. हे शिक्षकांचा उदोउदो करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षकांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नियुक्ती देऊन शिक्षक दिनाचे पवित्र कायम जपावे.
- प्रमोद रेवतकर, केंद्रीय अध्यक्ष
खासगी प्राथमिक शिक्षक संघ.