शिक्षक कॅशलेस आरोग्य सेवेच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: September 5, 2016 00:40 IST2016-09-05T00:40:56+5:302016-09-05T00:40:56+5:30
दरवर्षी शिक्षकदिनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार देवून शिक्षकांचा गौरव केला जातो.

शिक्षक कॅशलेस आरोग्य सेवेच्या प्रतीक्षेत
शिक्षकदिनी घोषणा व्हावी : स्वेच्छा निवृत्तीचा विचार
अशोक पारधी पवनी
दरवर्षी शिक्षकदिनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार देवून शिक्षकांचा गौरव केला जातो. राज्य व केंद्र शासनातील मंत्री शिक्षकस्नेही असल्याचा देखावा निर्माण करुन श्क्षिकांचा सत्कार करीत असतात. यावर्षी विघ्नहर्त्याने तो दिवस लांबणीवर टाळला. श्री गणेश चतूर्थीचा राज्यभर उत्सव असल्याने शिक्षकदिनाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आलेला आहे. कॅशलेश आरोग्य सेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना ही सुविधा केव्हापासून देणार ह्याची घोषणा जरी आली तरी लाभ शिक्षकांना होवू शकतो.
राज्यात अतिरिक्त शिक्षकांचे भूत संस्थाचालक व मुख्याध्यापकांच्या मानगुटीवर बसले असतांना मुख्याध्यापक व अतिरिक्त ठरणारे शिक्षक तणावमुक्त कसे राहणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. ह्या त्रासाला कंटाळून कित्येक मुख्याध्यापक स्वेच्छा निवृत्तीचा विचार करुन लागले आहेत. शिक्षकांना घशाचे आजार, हृदय विकार, उच्च रक्तदाब, पाठीचा कणा, मधुमेह असे विविध आजार त्रस्त करु लागले असतांना शासनाने शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य सेवेचा लाभ देण्याची घोषणा गेल्या कित्येक महिन्यापूर्वी केलेली आहे. परंतू शिक्षक आमदारांच्या नाकर्तेपणामुळे ही योजना प्रत्यक्षात अंमलात येवू शकली नाही.