शिक्षक हाच समाजाचा खरा शिल्पकार
By Admin | Updated: December 27, 2016 01:04 IST2016-12-27T01:04:31+5:302016-12-27T01:04:31+5:30
शिक्षक हा समाजाचा प्रमुख घटक आहे. विद्यार्जनातून भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

शिक्षक हाच समाजाचा खरा शिल्पकार
भाग्यश्री गिलोरकर : आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा, चार महिन्यानंतर पार पडला शिक्षक दिनाचा कार्यक्रम
भंडारा : शिक्षक हा समाजाचा प्रमुख घटक आहे. विद्यार्जनातून भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. मराठी शाळांची अधोगती थांबविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. शिक्षक हाच समाजाचा खरा शिल्पकार असून शिक्षकच समाजाचा आरसा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी केले.
जिल्हा परिषद सभागृहात आज सोमवारला जिल्ह्यातील ९ आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, नीळकंठ कायते, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अभयसिंह परिहार, उपशिक्षण अधिकारी चोले उपस्थित होते.
यावेळी गिलोरकर म्हणाल्या, जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती होत आहे. ती निरंतर टिकावी यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्जनातून विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले म्हणाल्या, शिक्षक नसते तर समाज घडला नसता. शिक्षकांनी कुठल्याही अपेक्षेविना पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे. शिक्षकांच्या योग्य कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करावे. शिफारसपत्राची जोड लावणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले म्हणाले, शिक्षणाची नैतिकता कमी झालेली आहे. विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. नीळकंठ कायते म्हणाले, शिक्षकांनी राजकारणाला बळी पडू नये. शिक्षकांनी स्वत:ची जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळावी, असे प्रतिपादन केले.
पुरस्कार विजेते संजय आजबले व दिपीका बांते यांनी पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्यावतीने मनोगत व्यक्त केले. दरम्यान शिक्षक रसेसकुमार फटे यांच्या घोषवाक्य लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मांढळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आमना सय्यद, इटगावचे संजय आजबले, रेंगेपारचे संतोष खंडारे, बिडचे विलास बाळबुध्दे, वडेगावच्या लिला टेंभरे, लवारीचे केशव अतकरी, ठाणाचे जिवनप्रकाश काटेखाये या प्राथमिक गटातील शिक्षकांचा तर माध्यमिक गटातील वरठी येथील शिक्षीका दिपीका बांते व बारव्हा येथील नामदेव शेंडे या शिक्षकाचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षक संघटनेचे रमेश सिंगनजुडे, मुबारक सय्यद, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, वसंत साठवणे, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, विकास गायधने, मुकूंदा ठवकर, संदीप वहिले, राजेश सव्वालाखे यांच्यासह शिक्षक बांधव व विस्तार अधिकारी जगदिश उके, अविनाश भानारकर व अर्चना माटे उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अभयसिंग परिहार यांनी केले. संचालन योगेश पुडके यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी चोले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
सभापतींची अनुपस्थिती शिक्षकांमध्ये नाराजी
४जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने तब्बल चार महिन्यानंतर घेण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती राजेश डोंगरे, कृषी व पशूसंवर्धन सभापती नरेश डहारे, बांधकाम सभापती विनायक बुरडे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम यांची या कार्यक्रमातील अनुपस्थिती उपस्थितांना जाणवली. यासंदर्भात राजेश डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कार्यक्रमासाठीच आलेलो होतो. परंतु महत्त्वाचे काम वेळेवर आल्यामुळे व हा कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळे उपस्थित राहता आले नाही.