शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरणार
By Admin | Updated: August 10, 2014 22:49 IST2014-08-10T22:49:20+5:302014-08-10T22:49:20+5:30
बालकांना मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता आठवीपर्यंत शिक्षकांच्या कार्यभारानुसार इयत्ता नववी व दहावीला शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी संचय मान्यता लागू झाली आहे.

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरणार
पवनी : बालकांना मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता आठवीपर्यंत शिक्षकांच्या कार्यभारानुसार इयत्ता नववी व दहावीला शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी संचय मान्यता लागू झाली आहे. अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांवर या मान्यतेमुळे अतिरिक्त होण्याचा प्रसंग ओढावणार आहे.
संचय मान्यतेमुळे अनेक शिक्षकांवर गंडांतर येण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे सूत्र शिक्षण विभागाने ठरविले आहे. त्यानुसार अनुदानित तुकड्यांवरील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन त्याच संस्थेच्या कार्यालयातील अनुदानित रिक्त पदांवर संस्थेच्या माध्यमातून करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. खासगी संस्थेच्या शाळेत रिक्त पद उपलब्ध असल्यास महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियमावली १९८१ नुसार अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे सादर करावयाची आहे. शिक्षण सेवक व अतिरिक्त होणारे अतिरिक्त कर्मचारी यांनी नियुक्तीनंतर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला नसेल तर त्यांची सेवा तात्काळ समाप्त करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन एक महिन्यानंतर त्याच शाळेत काढले जाणार नाही अशा सूचनाही देऊन शालार्थ प्रणालीद्वारे वेतन काढल्यास संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत ३५ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक याप्रमाणे शिक्षक मान्य केले गेलेले आहेत. इयत्ता नववी व दहावीसाठी शिक्षकांच्या कार्यभारानुसार शिक्षकसंख्या मान्य करण्यात आलेली आहे. तर २०० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षकेत्तर कर्मचारी मान्य झालेले आहेत.त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न कसा मार्गी लागेल याकडे मुख्याध्यापक, अतिरिक्त कर्मचारी व संस्थाचालकांचे लक्ष लागले असून त्यांचे समायोजन करावे अशी अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)