शिक्षकांच्या मागणीसाठी मुलांना शाळेत पाठविलेच नाही
By Admin | Updated: November 13, 2014 22:56 IST2014-11-13T22:56:46+5:302014-11-13T22:56:46+5:30
तालुक्याीतल वांगी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच पाठविले नाही. त्यामुळे आज विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जोपर्यंत शिक्षकांची पूर्तता होणार नाही,

शिक्षकांच्या मागणीसाठी मुलांना शाळेत पाठविलेच नाही
पालकांनी केला निर्धार : वांगी येथील प्रकार
साकोली : तालुक्याीतल वांगी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच पाठविले नाही. त्यामुळे आज विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जोपर्यंत शिक्षकांची पूर्तता होणार नाही, तोपर्यंत शाळेत मुलांना पाठविणार नाही, असा निर्धार वांगीवासीयांनी घेतल्याने पंचायत समितीचे शिक्षण विभाग अडचणीत सापडले आहे.
साकोलीपासून पंधरा कि.मी. अंतरावरील वांगी या गावात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. या शाळेत वर्ग १ ते ८ असून या शाळेत १५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर वर्गानुसार या शाळेत एकूण आठ शिक्षक पाहिजे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. सद्यस्थितीत या शाळेत फक्त चारच शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.
या शाळेला तीन पदवीधर शिक्षक व एक उच्चश्रेणी शिक्षक पाहिजे. यासाठी शाळा समिती, सरपंच व गावकऱ्यांनी अनेकदा शिक्षणाधिकारी, खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना लेखी कळविले आहे. दरम्यान या सर्वांनी सामूहीकरित्या निर्णय घेतला. आज विद्यार्थ्यांना शाळेतच पाठविले नाही. नेहमीप्रमाणे शाळा उघडली. ४ शिक्षकही वेळेवर आले, मात्र शाळेत विद्यार्थी आले नाही. याची माहिती तात्काळ शिक्षकांनी पंचायत समितीला कळविली. मात्र पंचायत समितीकडून निर्णय घेण्यात आला नाही. शिक्षण विभागातर्फे विस्तार अधिकारी पडोळे यांना पाठविण्यात आले. यावेळी पडोळे यांनी गावकरी, सरपंच व शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र शिक्षकांची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही पाल्यांना शाळेत पाठविणार नाही या गावकऱ्यांच्या भूमिकेपुढे प्रशासनही नमले. आज तात्काळ जवळच्याच गावातील शाळेतील शिक्षक पाठविण्यात आले. उर्वरीत ३ शिक्षक उद्या दि. १४ ला पाठवू असे लेखी आश्वासन पडोळे यांनी दिले. ३ शिक्षकांची पूर्तता झाली नाही तर उद्याही शाळा भरणार नाही, यावर गावकरी ठाम आहेत. यावेळी सरपंच गोपाल परतेकी, उपसरपंच मुकेश कापगते, शाळा समितीचे अध्यक्ष वसंता कापगते, प्रकाश डोंगरवार, राजू कापगते, चैतराम दिघोरे, हेमराज हातझाडे, काशीनाथ हातझाडे, गजानन मुर्गे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)