पोशिंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला धडा शिकवा
By Admin | Updated: August 30, 2014 23:26 IST2014-08-30T23:26:31+5:302014-08-30T23:26:31+5:30
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी कर्जबारी होऊन मरणाच्या खाईत लोटत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले असून राज्य शासन निगरगट्ट बनले आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला

पोशिंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला धडा शिकवा
आमदार भोंडेकर यांचे आवाहन : भंडारा येथे धरणे
भंडारा : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी कर्जबारी होऊन मरणाच्या खाईत लोटत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले असून राज्य शासन निगरगट्ट बनले आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला धडा शिकवून सत्तेतून हद्दपार करा, असे आवाहन शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने आज येथील त्रिमूर्ती चौकात आमदार भोंडेकर व जिल्हा प्रमुख राधेश्याम गाढवे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. भोंडेकर म्हणाले, राज्य शासनाचे अनेक मंत्री घोटाळ्यात अडकले आहेत. अशा घोटाळेबाज सरकारकडून सामान्य जनतेने काय अपेक्षा ठेवावी. शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे थोतांड राज्य सरकार करीत आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना होत नाही.
सरकारी कार्यालयात वारंवार चकरा मारूनही त्यांचे काम होत नाही. सरकाराचे नियंत्रण नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी व शेतकरी विरोधी सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी जनतेने सज्ज रहावे, व येत्या निवडणुकीत त्यांना सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या आंदोलनात जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा, अतिवृष्टीचे पैसे त्वरीत द्यावे, शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा द्यावा, रेशनकार्ड त्वरीत वितरीत करावे, प्रकल्प बाधितांना त्वरीत अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांचे वीज जोडणी कापू नये, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे प्रकरणे त्वरीत निकाली काढावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. सदर मागण्यांचे निवेदन आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भंडाऱ्याचे तहसीलदार सुशांत बनसोडे यांना दिले. आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख हेमंत बांडेबुचे, सुनिल कुरंजेकर, प्रशांत लांजेवार, अनिल गायधने, राजु थोटे, उमराव सेलोकर, बबलु आथिलकर, सतीश तुरकर, नरेश झलके आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)