तुमसर आगाराचे नियोजन ढेपाळले
By Admin | Updated: September 2, 2014 23:31 IST2014-09-02T23:31:34+5:302014-09-02T23:31:34+5:30
प्रवाशांच्या सेवेत सदैव तत्पर, हात दाखवा - बस थांबवाङ्क अशी बिरुदावली असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तुमसर आगाराचे नियोजन ढेपाळले आहे. बस अनियमिततेचा फटका

तुमसर आगाराचे नियोजन ढेपाळले
तुमसर : प्रवाशांच्या सेवेत सदैव तत्पर, हात दाखवा - बस थांबवाङ्क अशी बिरुदावली असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तुमसर आगाराचे नियोजन ढेपाळले आहे. बस अनियमिततेचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. आगार व्यवस्थापन व नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवरचा वचक सुटलेला आहे.
एस.टी.चा प्रवास सुरक्षित समजला जातो. नफा-तोट्याचा विचार न करता महामंडळातर्फे दुर्गम व अतिदुर्गम भागात एस.टी.ची सेवा दिली जात आहे. परंतु तुमसर आगार प्रमुखांचे कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सुटल्यामुळे वेळेचे नियोजन फिस्कटले आहे. येथील अनेक एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड आहेत. काही बसेस जीर्ण अवस्थेत धावत आहेत. तुमसर आगारातून लांब व मध्यम पल्याच्या बसेस धावतात. यात परतवाडा, अकोला, माहूर, वर्धा, उमरेड, काटोल तर मध्यप्रदेशात कटंगी, बालाघाट, वारासिवणी, मुलाजखंड येथे बसफेऱ्या सुरू आहेत. परंतु सदर बसेस नियोजित वेळी सुटत नाहीत. नियोजित वेळेपेक्षा अर्धा - एक तास उशीराने सुटतात.
दि.१ सप्टेंबरच्या रात्री बसेसच्या अनियमिततेचा फटका तुमसर-बपेरा राज्यमार्गावरील प्रवाशांना बसला. शेकडो विद्यार्थी बसेसच्या प्रतिक्षेत ताटकळत राहिले. ४.३० वाजताची तुमसर-पिपरी-चुन्नी बस नियोजित वेळेपेक्षा तब्बल सव्वा दोन तास उशिरा सुटली. ५.४५ वाजताची तुमसर-बपेरा बस नियोजीत वेळेपेक्षा दीड तास उशिरा सुटली. सायंकाळी ७.३० वाजताची तुमसर-बपेरा मुक्कामी बस क्र. एम.एच.४०/८६९९ ही नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने सुटली. ८.१५ वाजताची चांदपूर मुक्कामी बस क्र.एम.एच.४०/एन.८१३१ ही ९.०० वाजता सुटली. वारासिवनी बस क्र.एम.एच.४०/८९९५ ही ८.४५ वाजताची बस ९.०५ वाजता सुटली. तिनही बसेस एकाच वेळी फलाटावर लागल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.
जी बस आधी सुटायला पाहिजेत होती ती न सुटता, चांदपूर बस आधी सुटली. या बसेसच्या मागे वारासिवनी व बपेरा या बसेस सुटल्या. आज मंगळवारला सकाळी १० वाजता तुमसर-अकोला बस सुटल्यानंतर नागपूरकरीता सव्वा तासाने तुमसर-नागपूर बस सोडण्यात आली. १०.१५ वाजताची तुमसर-काटोल, १०.३० वाजताची तुमसर-नागपूर, १०.४५ वाजताची तुमसर-परतवाडा, ११.१५ ची तुमसर-काटोल या बसेसचा ११.३० पर्यंत ठावठिकाणाच नव्हता. परिणामी प्रवाशांना तासन्तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागले.
बसस्थानकावर जुनेच दरफलक
दोन वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस.टी.च्या भाडयात सहा ते आठ वेळा भाडेवाढ केली आहे. परंतु येथील प्लाटफार्मवर तीन वर्षापुर्वीचेच दरफलक लागलेले आहे. या दर फलकामुळे अनेकदा प्रवाशी आणि वाहकामध्ये शाब्दीक बाचाबाची होते. तीन वर्षाच्या कालावधीमध्ये एकाही आगारप्रमुखाने हे दरफलक बदलविण्याचे सौजन्य दाखविले नाही.
विभागात सर्वाधिक उत्पन्न
मिळवून देणारे आगार
तुमसर आगारातून मध्यम आणि लांब पल्याच्या तसेच दुर्गम आणि अतिदुर्गम भागात बसफेऱ्या चालविल्या जातात. तत्कालीन आगारप्रमुखांच्या नियोजनामुळे तीन वर्षे आगाराने विभागात उत्पन्न मिळवून देण्यात प्रथम क्रमांक पटकाविले. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे आगार म्हणून तुमसर आगाराची ख्याती झाली. परंतु त्यांच्या स्थानांतरानंतर आगाराला उतरती कळा लागली. त्यांच्यानंतर आलेल्या आगार प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना रान मोकळे करून दिले. परिणामी आज ते आपल्या मनमर्जीने वागत आहेत.
आगार परिसरात अस्वच्छता
तालुक्याचे मुख्य बसस्थानक तुमसर असल्याने येथून दिवसाला हजारो प्रवाशी प्रवास करतात. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येथील दुर्गंधीचा सामना करावा लागतो. आगाराच्या प्रवेशद्वारावरील दुकानदार येथे केरकचरा फेकतात. तर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मलमूत्र सोडले जाते. परिणामी परिसर अस्वच्छतेचे माहेरघर झाले आहे. नव्यानेच आलेल्या आगारप्रमुखांनी तरी येथील समस्येवर लक्ष देण्याची गरज असून नियोजनबद्ध आणि वेळेनुरूप बसेस सोडल्यास आगाराच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होणार हे निश्चितच. गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची! (तालुका प्रतिनिधी)