आंधळगावात होणार टसर हब

By Admin | Updated: November 8, 2015 00:39 IST2015-11-08T00:39:20+5:302015-11-08T00:39:20+5:30

भंडारा जिल्ह्यात पूर्वी टसर कोषाचे उत्पादन मोठया प्रमाणात होत असे. त्यापासून कापड व साडयांची निर्मिती विणकरांच्या माध्यमातून केली जात होती.

Tasar hub to be opened in Andhra Pradesh | आंधळगावात होणार टसर हब

आंधळगावात होणार टसर हब

बैठकीत निर्णय : जागेसाठी महसूल विभागाला निधी सुपूर्द
भंडारा : भंडारा जिल्ह्यात पूर्वी टसर कोषाचे उत्पादन मोठया प्रमाणात होत असे. त्यापासून कापड व साडयांची निर्मिती विणकरांच्या माध्यमातून केली जात होती. यातून विणकरांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असे. मात्र आज या व्यवसायातील विणकरांच्या हाताला काम नाही. म्हणूनच येथील टसर सिल्कला नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, रेशीम विभाग आणि माविमकडून संयुक्त प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
त्याचाच भाग म्हणून आंधळगाव येथील नदी काठावर जीर्णावस्थेत असलेली इमारत विकसित करून तेथे टसर हब निर्माण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी घेतला आहे.
या बैठकीला माविमच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कुसुम बाळसराफ, रेशिम विकास अधिकारी रायसिंग, जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, केंद्रीय रेशम बोर्डचे अधिकारी कोलारकर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी चांदेवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक खोब्रागडे उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातील टसर सिल्क अतिशय उच्च दर्जाचे आहे. मात्र पैठणी किंवा हिमरू शालीसारखी अद्याप येथील सिल्कची ओळख इतर राज्यात निर्माण झाली नाही. म्हणूनच इथल्या कोषापासून तयार होणारे कापड आणि साड्यांना ब्रँड म्हणून बाजारात आणण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीत आंधळगाव येथील जागा माविमला देण्याचा निर्णय घेण्यात आला. माविमच्या उपाध्यक्ष कुसुम बाळसराफ यांनी या जागेसाठी १२ लाख रुपये महसूल विभागाकडे जमा करण्यास मान्यता दर्शविली.
टसर धागा ते डिझायनर कापड व साडी निर्मिती करण्याच्या दृष्टीकोनातून या जागेला विकसित करण्यात येईल. यामधून कमीत कमी शंभर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. टसर कोष ते कापड निर्मिती करणारी एक कंपनी स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आाला. त्यामुळे भविष्यात भंडाऱ्याच्या टसर सिल्क साडीला नविन ओळख मिळेल,, अशी आशा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Tasar hub to be opened in Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.