सिहोरा परिसरात तापाची साथ
By Admin | Updated: September 8, 2014 00:45 IST2014-09-08T00:45:19+5:302014-09-08T00:45:19+5:30
दोन नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात तापाची साथ पसरली आहे. शासकीय रुग्णालय तथा खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येने हाऊसफुल होत आहेत.

सिहोरा परिसरात तापाची साथ
चुल्हाड (सिहोरा) : दोन नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात तापाची साथ पसरली आहे. शासकीय रुग्णालय तथा खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येने हाऊसफुल होत आहेत. यात बपेरा गावात डेंग्यू या आजाराचे ३ रुग्ण आढळल्याने परिसरात भिती निर्माण झाली आहे.
सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्या आहेत. या नद्यांचे पुराचे पाणी शेतशिवार आणि गावात शिरत आहे. पुराचे पाणी ओसरताच अनेक आजारांचा गावात प्रसार होत आहे. परिसरात नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी शासकीय रुग्णालय तथा खासगी दवाखाने आहेत. सिहोऱ्यात ग्रामीण रुग्णालय, चुल्हाडात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बपेरा गावात आंग्ल दवाखाना कार्यरत आहे. गावागावात उपकेंद्र आहेत. आरोग्य सेवेत सक्षम असणारा परिसर आज घडीला रिक्त पदामुळे वांझोटा ठरत आहे. चुल्हाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नाही. या केंद्रा अंतर्गत बपेरा, चुल्हाड, परसवाडा, वाहनी, हरदोली, मोहाडी (खापा) सिहोरा आणि टेमणी गावात उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रात आरोग्य सेवकांची पदे रिक्त आहेत. उपकेंद्रात परिचारिका नाहीत. (वार्ताहर)
तुमसरात डेंग्यूची धास्ती
तुमसर : तालुक्यात मागील एका महिन्यापासून डेंग्यूसदृष्य आजाराने थैमान घातले आहे .शासकीय उपाययोजना याकरिता कमी पडली असून प्रत्येक घरात किमान एक रुग्ण तापाने आजारी आहे. रोगाबद्दल भीती तथा डेंग्यू या आजारावर सर्वसामान्य नागरिकात जनजागृतीकरिता सोमवारी दुपारी ३ वाजता एकदिवसीय कार्यशाळा पं.स. कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विषयक तज्ज्ञ उपस्थित राहणार असून या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डोईफोडे, खंडविकास अधिकारी स्नेहा कुळथे, पं.स. सभापती कलाम शेख मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत डेंग्यू आजार त्याची कारणे, लक्षणे, उपाय यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तुमसर तालुक्यातील अनेक गावात डेंग्यूसदृष्य आजाराची लागण अनेकांना झाली आहे. शासकीयस्तरावर उपाययोजना कमी पडल्याने अनेकांनी खासगी दवाखान्यातून उपचार करणे सुरु आहे. डेंग्यू आहे किंवा नाही एकवाक्यता नाही. शासकीय वैद्यकीय अधिकारी डेंग्यू हा आजार नसल्याचे सांगतात. पुणे व नागपूर येथील प्रयोगशाळेतून रक्ताचे नमूने पॉझीटीव्ह आले तरच डेंग्यू आहे. अन्यथा तो ताप डेंग्यूचा नाही. त्यामुळे नेमका कोणता आजार आहे याबाबत तालुक्यात संभ्रवस्था आहे. (तालुका प्रतिनिधी)