तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बदलणार
By Admin | Updated: September 25, 2016 00:51 IST2016-09-25T00:51:57+5:302016-09-25T00:51:57+5:30
ऐन नगरपरिषद निवडणुकीपुर्वी साकोली तालुक्यात काँग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले असून काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बदलणार अशी चर्चा आहे.

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बदलणार
साकोली तालुक्यात चर्चा : होमराज कापगते यांची वर्णी लागण्याची शक्यता
संजय साठवणे साकोली
ऐन नगरपरिषद निवडणुकीपुर्वी साकोली तालुक्यात काँग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले असून काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बदलणार अशी चर्चा आहे. याशिवाय आणखी काही पदावर स्थगितीचे पत्र आल्याने काँग्रेसमध्ये चर्चांना पेव फुटले आहे. या फेरबदलाचा परिणाम आगामी नगर परिषद निवडणुकीवर होईल, अशी चर्चा आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर नंदकिशोर समरीत यांची तालुका अध्यक्षपदावर निवड करण्यात आली होती. त्यानंतर काही महिने काँग्रेसचा कारभार सुरळीत सुरू होता. त्यानंतर साकोली नगर परिषदेची घोषणा झाली. येत्या २७ सप्टेंबरला साकोली येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी संपूर्ण टीम कामाला लागली. या कार्यकर्ता मेळाव्याच्या तयारीवरून वाद निर्माण झाला. तालुका अध्यक्ष समरीत यांच्याशी पदाधिकाऱ्यामध्ये ‘तु तु - मै मै’ झाले. वाद इतका विकोपाला गेला की यानंतर तालुका अध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरू झाली. नवीन तालुका अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे.
ही चर्चा रंगात येत नाही तीच जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिवांची प्रदेश कार्यकारीणीने तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती आहे. हा दुसरा नवीन वाद काँगे्रसमध्ये निर्माण झाला आहे. या दोन्ही प्रकरणासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी साकोली येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करून कार्यकर्त्यांशी चर्चा केली.