जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना मिळणार नवा लॅपटॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:02+5:302021-04-07T04:36:02+5:30
भंडारा : राज्य शासनाने राज्यातील सर्व तलाठी, तसेच मंडळ अधिकाऱ्यांना डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड कार्यक्रमांतर्गत लॅपटॉप व प्रिंटर देण्याचे ...

जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना मिळणार नवा लॅपटॉप
भंडारा : राज्य शासनाने राज्यातील सर्व तलाठी, तसेच मंडळ अधिकाऱ्यांना डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड कार्यक्रमांतर्गत लॅपटॉप व प्रिंटर देण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलाठ्यांना लवकरच लॅपटॉप मिळणार आहेत. यासाठी मागच्याच महिन्यात निविदा काढण्यात आली असून, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे लॅपटॉप, प्रिंटर मिळावे, म्हणून वारंवार पाठपुरावा केला होता. त्यातच कोरोना संसर्ग वाढत चालल्याने, आता अनेकदा वर्क फ्रॉम होममुळे लॅपटॉपची मागणीही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही याची दखल घेत, त्वरित निविदा प्रक्रिया राबविली असून, आता लवकरच अंतिम प्रक्रियेत आहे, अशी माहिती आहे.
जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी यांना यापूर्वी २०१४ मध्ये लॅपटॉप, प्रिंटर देण्यात आले होते. मात्र, या लॅपटॉपमध्ये तांत्रिक बिघाड, तसेच अनेकांचे लॅपटॉप हे नादुरुस्त झाले असल्याने, काही तलाठ्यांनी हे नादूरुस्त लॅपटॉप तहसीलकडे जमा केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडून सातबाराची मागणी, विविध खरेदीच्या नोंदी व विविध योजनांचे अपडेट ठेवण्यासाठी तलाठ्यांना स्वतः कामासाठी लॅपटॉप खरेदी करावे लागले आहेत. ही लॅपटॉपची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने लॅपटॉप द्यावे, अशी मागणीही तलाठी करू लागले आहेत.
बॉक्स
२०१४चे अनेकांचे लॅपटॉप झाले नादुरुस्त
महाभूमी अंतर्गत ई-फेरफार अंमलबजावणीसाठी, तसेच जिल्ह्यात ऑनलाइन सातबारा प्रणालीमुळे जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना यापूर्वी २०१४ साली लॅपटॉप देण्यात आले होते. मात्र, त्यापैकी अनेक तलाठ्यांचे लॅपटॉप कालबाह्य व नादुरुस्त होत माउस, की बोर्ड खराब झाले आहेत. यामुळे नादुरुस्त लॅपटॉप काही तलाठ्यांनी तहसीलकडे जमा केले आहेत. त्यामुळे तलाठ्यांना अनेकदा कामात अडचणी येत असल्याचेही वास्तव आहे.
कोट
पूर्वी मिळालेला लॅपटॉप नादुरुस्त व कालबाह्य झाला असल्याने, तहसीलकडे जमा केला आहे. शासनाने तलाठ्यांना नवीन लॅपटॉप दिल्यास कामाची गती वाढेल. कोरोना परिस्थितीत लॅपटॉप लवकर मिळावे, ही प्रशासनाकडून अपेक्षा आहे. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीत, त्यांना अनेकदा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कामे वेळेत होण्यासाठी लॅपटॉप गरजेचा झाला आहे.
महादेव ईप्पर,
तलाठी खरबी ( नाका ) ता.भंडारा
कोट
स्वखर्चाने घेतलेल्या लॅपटॉपवरून शासनाच्या ऑनलाइन योजनांचा, तसेच सातबाराचे दररोजचे काम करीत आहे. ज्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे लॅपटॉप, प्रिंटर नादुरुस्त झाले आहेत, त्यांना ते लवकर मिळाल्यास गावपातळीवरील अनेक शासकीय कामे आणखी वेगाने होतील.
देवानंद उपराडे, तलाठी, सिरसी ता.भंडारा