लाच घेताना तलाठी जाळ्यात
By Admin | Updated: September 22, 2014 23:12 IST2014-09-22T23:12:45+5:302014-09-22T23:12:45+5:30
विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोहाडी येथील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. रामरतन टिकाराम इलमे असे या अटक

लाच घेताना तलाठी जाळ्यात
मोहाडीतील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
भंडारा : विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोहाडी येथील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. रामरतन टिकाराम इलमे असे या अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
मोहाडी येथील तलाठी कार्यालयात तलाठी रामरतन इलमे कार्यरत आहेत. तक्रारकर्ता यांची शेती व विटाभट्टीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे तीन ट्रॅक्टर आहेत. दि. २१ सप्टेंबर २०१४ रोजी ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६ एल ७१६ द्वारे महालगाव ते वरठी या मार्गावर विटांची वाहतूक करीत असताना मोहाडी येथील चौकात सदर तलाठ्याने ट्रॅक्टर पकडला. याची माहिती ट्रॅक्टरचालक विलास ढबाले यांनी भ्रमणध्वनीहून ट्रॅक्टरमालकाला दिली.
तक्रारकर्त्याने भ्रमणध्वनीहून तलाठी इलमे यांना ट्रॅक्टर सोडून देण्याची विनंती केली. ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी इलमे यांनी ३२०० रुपयांची मागणी केली.
पैसे देण्याचे मान्य नसल्याने याची तक्रार भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला.
दरम्यान आज सोमवारला रामरतन इलमे यांना तडजोडीनंतर तक्रारकर्त्याकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मोहाडी पोलिसात इलमे यांच्याविरुद्ध कलम ७, १३ (१), (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९७८ अन्वये गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून दोन हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक भातकुले, पर्वते, पोलीस नायक अशोक लुलेकर, राजेश ठाकरे, सचिन हलमारे, गौतम राऊत, भाऊराव वाडीभस्मे, मनोज पंचबुद्धे, अश्विन गोस्वामी, शेखर देशकर, लोकेश वासनिक, टांगले यांनी केली. तपास पोलीस निरीक्षक जीवन भातकुले करीत आहेत. या घटनेमुळे मोहाडी तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. (प्रतिनिधी)