दोषीवर कठोर कारवाई करा
By Admin | Updated: July 1, 2016 00:46 IST2016-07-01T00:46:47+5:302016-07-01T00:46:47+5:30
शासन आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना घोषित करीत असताना भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील युवकाने आंतरधर्मीय विवाह करताच ..

दोषीवर कठोर कारवाई करा
प्रकरण वरठी येथील : महाराष्ट्र अंनिसने केला घटनेचा निषेध
भंडारा : शासन आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना घोषित करीत असताना भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील युवकाने आंतरधर्मीय विवाह करताच मुलीकडील मंडळींनी या तरूणाची हत्या केली. महाराष्ट्रात जात पंचायत कायदा मंजूर होऊनही आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचे खून केले जात आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वरठी येथील खुनाच्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
निवासी जिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले. भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील नेहरू वॉर्डातील रहिवाशी सोनू मेश्राम याने आंतरधर्मिय मुलीने हत्तीडोई येथील बौद्ध विहारात बौद्ध धर्माप्रमाणे लग्न केले. वशीम शेख, हमीद बब्बू शेख, हलील बब्बू शेख, कलाम बब्बू शेख, तासीक हलील शेख यांनी सोनू मेश्रामला घरून नेले आणि त्याचा खून केला. पुरोगामी महाराष्ट्रात शासन आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह व्हावे, यासाठी प्रचार आणि प्रसार करीत आहे. जात पंचायत विरोधी कायदा मंजुर झाला आहे. मात्र या परिणामकारक कायद्याचा प्रचार व प्रसार शासनातर्फे अद्याप करण्यात आलेला नाही. कायद्याचा वचक राहिलेला नसल्याने आंतरधर्मिय विवाह करण्याऱ्यांची हत्या करण्याचे धाडस समाजात केले जात आहे. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांच्या अशाप्रकारे हत्या केले जात असतील तर आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांनी कसे जगावे, असा प्रश्नही केला. खून करण्याऱ्यांवर महाराष्ट्र जात पंचायत विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. शिष्टमंडळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, प्रधानसचिव मेहमुद अली, सहसचिव प्रशांत रामटेके, मोहाडी कार्याध्यक्ष त्रिवेणी वासनिक, प्रा. नरेश आंबिलकर, लिलाधर बन्सोड, मेघा चवरे, सुजाता घोडीचोर, मकबूल बारशी, बासपा फाये, अश्विनी भिवगडे, कविता लोणारे उपस्थित होते. (वार्ताहर)