लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामाच्या नियोजनानुसार अपेक्षित लागवडीप्रमाणे मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते-निविष्ठा, कीटकनाशके यांची उपलब्धता असली पाहिजे. यात काही कमतरता असल्यास त्याचीही पूर्तता करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी ठेवावी. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच कृषी दुकानदारांची बैठक घेऊन बोगस बी-बियाणे विक्रीला चाप लावण्याच्या सूचना द्याव्यात. कृषी विभागाने याबाबत भरारी पथकांवर नियंत्रण ठेवावे. तसेच भरारी पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सजग राहून बोगस बी-बियाणे विक्रेत्यांवर अकुंश लावण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री संजय सावकारे यांनी दिले.
भंडारा येथे बुधवारी नियोजन भवनात जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व नियोजन-२०२५ ची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस पालकमंत्री सावकारे ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, खासदार प्रशांत पडोळे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, जिल्हाधिकारी संजय कोलते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खते, बी-बियाणे विक्रीनंतर दुकानदारांनी शेतकऱ्यांना पक्की देयके द्यावीत, असे ही निर्देश त्यांनी यावेळी दिले. राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना जलद व परिणामकारकरीत्या पोहोचाव्यात यासाठी अॅग्रिस्टॅक योजना राज्यात आपण प्राधान्याने हाती घेतली. या योजनेअंतर्गत येत्या ३१ मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित यंत्रणेने पूर्ण करावी, असेही सावकारे यांनी सांगितले. रेशीम व कृषी विभागाने शेतकरी प्रशिक्षणाचे नियोजन करण्याचे आवाहन केले.
तुमसर येथील रेल्वे रॅक पॉइंट दोन महिन्यांत पूर्ण करातुमसर येथील रेल्वे रॅक पॉइंटसाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील दोन महिन्यांत या कामाला पूर्ण करावे. राज्य शासनाच्या पाणी वाटप धोरणानुसार पिण्याचे पाणी व शेतीचे पाणी आरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. सर्व शासकीय कार्यालयावर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा लावण्यात यावी. गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाळ वाहतूक करताना सुलभता असली पाहिजे, जलयुक्त शिवार योजनेतील कामे पावसाळ्यापूर्वी करावी.