सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:22 IST2017-11-12T23:21:47+5:302017-11-12T23:22:04+5:30
साकोली येथील सुशील बनकर हे दुचाकीने भंडारा येथे येत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला.

सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : साकोली येथील सुशील बनकर हे दुचाकीने भंडारा येथे येत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दर्शविण्यात येत असले तरी त्यांचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अखील भारतीय माळी महासंघाने केली आहे.
माळी महासंघ शाखा भंडाराच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, मंगळवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास सुशील बनकर हे साकोली येथून भंडाराकडे त्यांचा दुचाकीने येत होते. दरम्यान त्यांनी कुटुंबियांना ते लाखनीत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर ते घरी पोहचले नाही. बुधवारला सकाळी त्यांचा साकोली-लाखनी दरम्यान मुंडीपार येथे मृतदेह आढळून आला. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दर्शविण्यात येत असले तरी त्यांचा मृत्यू नसून खून असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असल्यांना शिक्षा व्हावी यासाठी चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी माळी महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश अटाळकर, साकोली तालुकाध्यक्ष अनिल किरणापुरे, भंडारा तालुकाध्यक्ष रमेश गोटेफोडे, नेपाल चिचमलकर, राजेश ठवकर, मधुसुदन किरणापुरे, श्रीराम राऊत, सुनील बनकर, अंकित चिचमलकर, अॅड. रविभूषण भुसारी, मिरा भट्ट आदी पदाधिकारी उपस्थित होते.