नोकरीत राहून खाजगी दवाखाने चालविणाऱ्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: February 22, 2016 01:01 IST2016-02-22T01:01:27+5:302016-02-22T01:01:27+5:30
शासकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टरांना खाजगी दवाखाना टाकू नये यासाठी मूळ वेतनाच्या ३० टक्के भत्ता देण्यात येतो.

नोकरीत राहून खाजगी दवाखाने चालविणाऱ्यांवर कारवाई करा
पटोले यांचे निर्देश : दक्षता सनियंत्रण समितीची बैठक
भंडारा : शासकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टरांना खाजगी दवाखाना टाकू नये यासाठी मूळ वेतनाच्या ३० टक्के भत्ता देण्यात येतो. मात्र तरीही सार्वजानिक आरोग्य सेवेतील डॉक्टर रूग्णांना योग्य सेवा न देता खाजगी दवाखाने उघडून बसतात. अशा खाजगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर करवाई करण्याच्या सूचना खा. नाना पटोले यांनी दिले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामीण रूग्णालयांमध्ये चांगल्या सुविधा मिळण्यासाठी शासन अनेक उपाय योजना राबवित आहे. मात्र तरीही ग्रामीण भागात चांगल्या सेवा मिळत नाहीत, अशी तक्रार लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. नागरिकांनी सार्वजनिक रूग्णालयातील कोणत्याही तक्रारीसाठी १०४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. तसेच गर्भवती आणि बालकांना उपचारासाठी रूग्णालयात ने-आण करण्यासाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका मागवू शकता, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेन्द्र पातुरकर यांनी यावेळी सांगितले.
सध्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीला मोठी मागणी आहे. याचा भविष्यातील विचार करता आपल्याकडील जंगल, आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भंडारा येथे आयुष दवाखान्यासाठी प्रस्ताव तयार करुन केंद्र शासनाकडे पाठवावा. यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे खा. पटोले यानी यावेळी सांगितले.
मिशन इंद्रधनुष अंतर्गत ८९ बालकांना लसीकरण करण्यात आले. जननी सुरक्षा योजनेमध्ये रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण ९९.६४ टक्के आहे, अशी माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पातुरकर यांनी यावेळी दिली. (नगर प्रतिनिधी)