‘महाल’ विक्रीतील दोषींवर कारवाई करा

By Admin | Updated: May 20, 2017 00:55 IST2017-05-20T00:55:58+5:302017-05-20T00:55:58+5:30

शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या पांडे महालच्या विक्रीबाबत दोषींवर कठोर कारवाई करावी,

Take action against the guilty in the 'Mahal' sale | ‘महाल’ विक्रीतील दोषींवर कारवाई करा

‘महाल’ विक्रीतील दोषींवर कारवाई करा

ेविविध संघटना एकवटल्या : प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा, ऐतिहासिक वास्तू वाचविण्याची धडपड
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या पांडे महालच्या विक्रीबाबत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पांडे महाल बचाव समितीतर्फे करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
शहरातील ऐतिहासिक पांडे महालाचे बांधकाम १७ व्या शतकात झाले आहे. पांडे महाल ही केवळ इमारत नसून जिल्ह्याची ओळख आहे. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व पालिकेच्या उदासिन धोरणामुळे महालाचे अस्तित्व धोक्यात आहे.
पर्यटन क्षेत्रात वाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या बाबतीत उलटेच चित्र आहे. महालाच्या बाबतीत तशीच प्रतिक्रीया उमटत आहे. महाल पुरातत्व विभागाला सोपविण्यात यावे, अशी मागणी स्वातंत्र लढ्यानंतर करण्यात येत होती. मात्र, प्रशासनाने याकडे नेहमी दुर्लक्ष केले. ९० च्या दशकात पांडे कुटुंबीयांनी प्रशासनाला प्रस्ताव दिला होता. त्यात महाल शासनाने खरेदी करुन त्याचे रुपांतर वस्तु संग्रहालयात करण्याचे म्हटले होते. पंरतु प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
सन २०१० मध्ये पांडे महाल पाडण्याचे षडयंत्र सुरु झाले. नगर पालिका प्रशासनाने या महालाला धोकादायक इमारतींच्या सुचीमध्ये दाखल केले. २०११ मध्ये या महालचा सौदा केला. महाल पाडण्यासाठी जेसीबीसह मजूर आल्यावरही प्रशासनाने त्याची घेतली नाही. तत्कालीन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकरणात उडी घेवून बांधकाम थांबविले तसेच सदर महाल पुरातत्व विभागाच्या हवाली करण्यात यावे यासाठी धडपड सुरु केली. गोसावी मठाचे जसे बांधकाम झाले तसेच बांधकाम किंवा जिर्णोध्दार पांडे महालाचा करावा अशी मागणी रेटून धरण्यात आली होती. मात्र प्रशासनाने पाठ दाखविली.
नाट्यमध्य घडामोडी अंतर्गत नोटीफिकेशनमधून पांडे महालाचे नाव हटविण्यात आले. याचाच अर्थ जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा सर्व प्रकार घडवून आणल्याचा आरोपही समितीने केला आहे. १२ मे २०१७ रोजी पांडे महालातील काही भाग विक्री करण्याअंतर्गत करारनामा करण्यात आला. यात दुय्यम निबंधक कार्यालयाची भूमिकाही अत्यंत महत्वाची आहे. राज्यपाल यांच्या नोटीफिकेशनमध्ये असलेल्या पांडे महालचा विक्रीनामा करताना हा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष ठेवणे गरजेचे होते. मात्र विक्रीनामा करण्याचा प्रकार भूमाफियांच्या दबावाखाली करण्यात आल्याचे स्पष्ट जाणवते. पांडे महालाचे अस्तित्व नेस्तनाभूत करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी तसेच पांडे महालची वास्तु सुरक्षीत ठेवण्यासाठी त्वरित आदेश काढावे अशी मागणी समितीने केली आहे. शिष्टमंडळात शिवसेनेचे प्रशांत लांजेवार, शहर प्रमुख सुर्यकांत इलमे, भाजपचे विकास मदनकर, श्रीराम सेवा समितीचे अध्यक्ष शैलेंद्र श्रीवास्तव, विवाह फाऊंडेशनचे अमित मेहर, सचिन बावने, फुटपाथ संघटनेचे अख्तरबेग मिर्झा, देवा कारेमोरे, संजय मते, बालु ठवकर आदी उपस्थित होते.
काँग्रेसही आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात पांडे महलाची विक्री रद्द करून महल खरेदीदार व अधिकाऱ्यांना अटक करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. शहरातील ऐतिहासिक महल या वास्तुची विक्री तसेच शहराची ऐतिहासीक ओळख मिटवून काढणारी विकृत मानसिकतेचे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्री करून अवघ्या एका तासामध्ये रजिष्ट्री केली. शिष्टमंडळात सचिन घनमारे, अजय गडकरी, विनीत देशपांडे, अखिल तिवाडे, विपुल खोब्रागडे, नितेश कान्हेकर, दिलीप देशमुख, निल दिक्षित, विलास ढेंगे, संदेश शामकुंवर, अयुब पटेल आदी उपस्थित होते.

Web Title: Take action against the guilty in the 'Mahal' sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.