तक्रारींची दखल घ्या अन्यथा कारवाई
By Admin | Updated: February 25, 2017 00:22 IST2017-02-25T00:22:43+5:302017-02-25T00:22:43+5:30
तुमसर तालुक्यातील जनतेच्या तक्रारींवर सात दिवसात दखल घेवून निपटारा करा, तशी माहिती टपालाने संबंधित तक्रारदार व मला द्या.

तक्रारींची दखल घ्या अन्यथा कारवाई
नाना पटोले : नऊ तास जनता दरबार, सात दिवसांत तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश
तुमसर : तुमसर तालुक्यातील जनतेच्या तक्रारींवर सात दिवसात दखल घेवून निपटारा करा, तशी माहिती टपालाने संबंधित तक्रारदार व मला द्या. केवळ वेळ मारुन नेऊ नका, अन्यथा नियमानुसार कारवाईस सामोरे जावे लागेल, असा खणखणीत इशारा विभाग प्रमुखांसह अधिकाऱ्यांना खासदार नाना पटोले यांनी दिला.
तुमसर तहसील कार्यालयाच्या मैदानावर आयोजित जनता दरबारात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, पं.स. सभापती कविता बनकर, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुध्दे, भाजप जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, भाजपा शहराध्यक्ष विजय जायस्वाल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी, माजी नगराध्यक्षा गीता कोंडेवार, नगरसेवक सुनिल पारधी, डॉ. हरेन्द्र राहांगडाले, नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर, प्रमोद घरडे उपस्थित होते.
वनहक्क समितीची दावे अनुसूचित जमाती ८०४, इतर मागासवर्गीय २६४० भंडारा येथे प्रस्ताव सादर करण्यात आले. ७० ते ८० वर्षापासून जंगलात अतिक्रमण करण्यात आले आहे. उपलब्ध जागेपेक्षा जास्त फेरफार करण्यात आले.
क्षेत्र कमी व फेरफार जास्त असा प्रकार भूमिअभिलेख कार्यालयात घडला. पंतप्रधान आवास योजनेत प्रत्येकाला घर त्याचे अ,ब,क,ड अंतर्गत वर्गीकरण, ग्रामपंचायतीला भेट देवून त्यांचा शेरा व कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे खा.नाना पटोले यांनी सांगितले. बावनथडी प्रकल्पअंतर्गत भूसंपादन, लघु वितरीत, पादचाऱ्या, शेतकऱ्यांचे थकीत रक्कम याविषयी तक्रारकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला. १४६७ खातेदारापैकी ३०० रजिस्ट्री करण्यात आल्या.
चौकशी करणे शुरु असून ११०० शेतकऱ्यांच्या रजिस्ट्री शिल्लक आहेत. मार्च २०१७ मध्ये या प्रकल्पाला संपूर्ण हिशोब द्यावयाचा आहे असे खा.नाना पटोले यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
आष्टी येथील शेतकरी अमृत सोनवाने यांनी बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपणास धमकी देवून पोलीसात तक्रार केली. शेतीतील विनापरवानगी झाडे तोडली. परंतु मोबदला दिला नाही असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी आ. चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नायब तहसीलदार शिंदे यांची खा. पटोले व आ.चरण वाघमारे यांनी कानउघाडणी केली. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची घरकुल प्रश्नावर खासदार पटोले व आमदार वाघमारे यांनी धारेवर धरले. सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत हा जनता दरबार सुरु होता. नऊ तास खा.नाना पटोले, आ. चरण वाघमारे व अधिकाऱ्यांची येथे उपस्थिती होती. प्रथमच विविध तक्रारींवर येथे चर्चा करुन निर्देश देण्यात आले. तहसील कार्यालयाच्या मैदानावर मोठा शामीयाना, मोठे स्टेज तयार करण्यात आले होते. तालुक्यातील आलेल्या जनता व अधिकाऱ्यांकरिता बैठक व्यवस्था, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
जनता दरबारात उपस्थित तक्रारींची दखल घेवून त्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी तालुक्यातील प्रत्येक विभागप्रमुख व अधिकाऱ्यांनी दिले. येणाऱ्या दिवसात त्या समस्या दूर व्हायला पाहिजे. यावेळी शहर भाजयुमो अध्यक्ष विक्रम लांजेवार, गौरव नवरखेले, राहुल डोंगरे, तहसीलदार डी.टी. सोनवाने, नायब तहसलदार हरिश्चंद्र मडावी, खंडविकास अधिकारी झिंगरे, लेंडेझरी चे वनपरिक्षेत्राधिकारी एस.यु. मडावी, तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी, व्ही. वाय. उगले, चोपकर, भवानी राहांगडाले, राधेश्याम लिल्हारे, मुटकुरे, ठाकचंद मुंगुसमारे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, जि.प. सदस्यसह उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील, भूमीअभिलेख, कृषी, सहाय्यक निबंधक, दुय्यम निबंधक, उषकोषागार, पंचायत समिती, पशुसंवर्धन, तालुका आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, कृउबा, महिला व बालकल्याण, डाक विभाग, विद्युत विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन तुमसर, सिहोरा, तालुका क्रीडा अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी तथा परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)