तहसील कार्यालय वाऱ्यावर!
By Admin | Updated: June 7, 2015 00:48 IST2015-06-07T00:48:24+5:302015-06-07T00:48:24+5:30
गतिमान प्रशासनाचा दावा करणारा महसूल विभागात शनिवारी तहसीलदारासह सर्वच नायब तहसीलदार, अन्न पुरवठा...

तहसील कार्यालय वाऱ्यावर!
नागरिकांना मनस्ताप
तहसीलदारांसह नायब तहसीलदारांची बैठकांना उपस्थिती
तुमसर : गतिमान प्रशासनाचा दावा करणारा महसूल विभागात शनिवारी तहसीलदारासह सर्वच नायब तहसीलदार, अन्न पुरवठा निरीक्षकांनी शासकीय बैठका असल्याने कार्यालयात अनुपस्थित होते. दुपारनंतर एकमेव नायब तहसीलदार कार्यालयात आल्याची माहिती आहे. शेकडो जणांना आल्यापावली परतावे लागले.
शनिवारी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ वाजता फेरफटका मारल्यावर नुकतेच रूजू झालेले तहसीलदार डी.टी. सोनेवानेसह इतर तीन नायब तहसीलसदार तहसील कार्यालयात अनुपस्थित होते. एकमेव नायब तहसीलदार अरविंद हिंगे कर्तव्यावर होते. दोन तासानंतर ते ही कामानिमित्त निघाले. परत दुपारी ते पुन्हा तहसील कार्यालयात परतले. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी बैठक आयोजित केली होती. त्याकरिता तहसीलदार डी.टी. सोनेवाने, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मडावी, अन्नपुरवठा निरीक्षक भंडारा येथे बैठकीनिमित्त गेले होते.
तुमसर तालुक्यातील शेकडो नागरीक विविध दाखले, प्रमाणपत्राकरिता सुमारे ४० ते ४५ कि.मी. अंतरावरून आले होते. त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यानिमित्त तहसीलदारासह नायब तहसीलदार बैठकांना गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांना किमान एक किंवा दोन नायब तहसीलदारांना मुख्यालयी ठेवण्याची गरज होती. नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, अरविंद हिंगे यांचे स्थानांतरण झाले आहे. तहसीलदार सनि यादव, महेंद्र सूर्यवंशी यांना केवळ एक वर्षे झाले होते. त्यांचे स्थानांतरण महसूल विभागाने केले. नियमावर बोट ठेवणाऱ्या महसूल खात्याने किमान कार्यालय वाऱ्यावर सोडून जाऊ नये, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. (तालुका प्रतिनिधी)