संपामुळे तहसील कार्यालय सुनसान
By Admin | Updated: July 3, 2014 23:23 IST2014-07-03T23:23:32+5:302014-07-03T23:23:32+5:30
नागपूर विभागातील १६ नायब तहसीलदारांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी, या मागणीसाठी भंडारा जिल्हा तहसीलदार / नायब तहसीलदार संघटनेने बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.

संपामुळे तहसील कार्यालय सुनसान
भंडारा : नागपूर विभागातील १६ नायब तहसीलदारांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी, या मागणीसाठी भंडारा जिल्हा तहसीलदार / नायब तहसीलदार संघटनेने बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमित सैनी यांना मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलनामुळे कामकाज ठप्प पडले असून याचा अनेकांना फटका बसत आहे. सध्या उपविभागीय अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे आहे.
१४ मे २०१२ रोजी नागपूर विभागातील नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्याबाबत ५३ नायब तहसीलदारांचे पदोन्नतीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी ३७ नायब तहसीलदारांना तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्यात आली.
मात्र उर्वरीत १६ नायब तहसीलदार हे सेवेत ज्येष्ठ असूनही पदोन्नतीपासून वंचित राहिले. या संदर्भात संघटनेने वेळोवेळी नागपूर विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.
मात्र २०१२ पासून विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली नसल्याचे तहसीलदार संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे संघटनेने सदर बाबीची पूर्तता होईपर्यंत नागपूर विभागातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.
तहसीलदार, नायब तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने कामकाजासाठी आलेल्या अनेकांना आल्यापावली परत जावे लागले. या आंदोलनाचा फटका बसत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आधीच उपविभागीय अधिकारी कुळमेथे यांच्या स्थानांतरण झाल्यामुळे प्रभारी उपविभागीय अधिकारींचा प्रभार उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तहसीलदारांचे आंदोलन व उपविभागीय अधिकाऱ्यांचे असलेले पद रिक्त यामुळे तहसील कार्यालयाचा कारभार वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. (नगर प्रतिनिधी)