दक्षतेसाठी तुमसर पोलिसांची रंगीत तालीम
By Admin | Updated: August 11, 2015 00:52 IST2015-08-11T00:52:08+5:302015-08-11T00:52:08+5:30
स्थानिक नवीन बसस्थानकाजवळ मातोश्री लॉन समोर एका चारचाकी वाहनाने अपघात होवून बालक जागीच ठार झाला.

दक्षतेसाठी तुमसर पोलिसांची रंगीत तालीम
पोलिसांच्या ताफ्याने अनेकांची भंबेरी
तुमसर : स्थानिक नवीन बसस्थानकाजवळ मातोश्री लॉन समोर एका चारचाकी वाहनाने अपघात होवून बालक जागीच ठार झाला. यावेळी नागरिकांत रोष निर्माण होऊन वाहनासह चालकालाही जाळण्याचा प्रयत्न सुरु असल्याने तुमसर पोलिसांना वायरलेसने माहिती देवून पोलीस प्रशासन काय उपाययोजना करू शकते, याची रंगीत तालीम घेण्यात आली.
पोलिसांच्या वायरलेसवर माहिती धडकताच सर्वप्रथम सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना एकत्र गोळा होण्याचे फर्मान सोडून उपजिल्हा रुग्णालयातून अॅम्बुलन्सवर घटनास्थळी पाठविण्यासंदर्भात सांगण्यात येवून नगरपरिषदेची अग्नीशमन गाडीही बोलाविण्यात आली. त्याचबरोबर गावातील काही प्रतिष्ठीत नागरिकांचाही सलोखा निर्माण करण्याकरिता घटनास्थळावर येण्यासंबंधी दूरध्वनीवरून विनंती करण्यात आली. दरम्यान काही क्षणातच ५० पोलिसांचा ताफाही नवीन बसस्थानकाजवळ मातोश्री लॉनसमोर उभी झाल्याने तुमसरात आणखी काही वेगळीच अनुचित घटना घडल्याची प्रचिती तुमसरकरांना आल्याने दबक्या आवाजात काय झालं, असे प्रश्न विचारणे सुरु होते. परंतु कुणीही काहीही सांगायला तयार नव्हता.
दरम्यान त्याच क्षणी भंडाऱ्याहून उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती शेंडे त्या ठिकाणी उपस्थित झाले व पोलीस निरीक्षक किशोर गवई यांना कोणकोणती दक्षता घेतल्याची विचारणा करून एक परेड मार्च करीत पोलिसांचा ताफा रवाना होताच ही पोलिसांची रंगीत तालीम असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तुमसरकरांनी सुटकेचा निश्वास घेतला. (शहर प्रतिनिधी)