निलक्रांतीतून ग्रामीण रोजगार निर्मितीला बळ
By Admin | Updated: May 24, 2017 00:21 IST2017-05-24T00:21:07+5:302017-05-24T00:21:07+5:30
शेतकऱ्यांना भातशेतीसह तलाव, बोड्या यामध्ये पुरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यावर भर देण्यात येत आहे.

निलक्रांतीतून ग्रामीण रोजगार निर्मितीला बळ
साकोलीत तलाव ते मासोळी अभियानाचा शुभारंभ : विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शेतकऱ्यांना भातशेतीसह तलाव, बोड्या यामध्ये पुरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यावर भर देण्यात येत आहे. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या स्थानिक उच्च प्रतीच्या व आहारात उपयुक्त अशा मासोळीचे उत्पादन वाढवणे आणि त्यातून निलक्रांतीतून ग्रामीण रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी व्यक्त केले.
साकोली येथील नवजीवन हायस्कुल येथे आयोजित तलाव ते मासोळी कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. यावेळी आमदार बाळा काशिवार, आमदार परिणय फुके, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, गोंदिया कार्यपालन अधिकारी ठाकरे, मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूरचे प्रा.शामकांत शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी अनुपकुमार म्हणाले, मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून अन्न साखळीत उत्तम दर्जाचे प्रथिने मिळवून मुलांची कुपोषणातून मुक्तता होऊ शकते. तसेच ग्रामीण भागातील लोकांना पुरक रोजगार व उपजिविकेचे अतिरिक्त साधन निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रात माशांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध आहे. तालाब तेथे तलाव हे क्रांतीकारक अभियान असून ग्रामीणांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून आणेल. मत्स्यव्यवसायासाठी सॅटेलाईटच्या सहाय्याने तलावाची निवड करून मत्स्यबिज, मत्स्यजीरे, बोटुकलीच्या व मासे उत्पादनात वाढ केली जाणार आहे.
यावेळी आमदार काशिवार यांनी विभागात भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यात साकोलीला तलाव तेथे मासोळी या अभियानाचा शुभारंभ होणे हे गौरवास्पद आहे. कोळी, ढिवर हा समाज मत्स्यव्यवसाय करतो. हा समाजाला शास्त्रीय पद्धतीने मत्स्यव्यवसाय करण्याचे ज्ञान या तलाव तेथे मासोळी अभियानातून दिले जाईल. या समाजाने व्यसनांपासून दूर राहावे. शासनाची गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार व मत्स्ययुक्त तलाव ही योजना राबवून समाजातील वंचित घटकापर्यंत आर्थिक विकास पोहचवला जाईल. गावतलाव, मामा तलाव ही पूर्वजांची देण गोंदिया, भंडारा जिल्ह्याला मिळाली आहे. अनेक वर्षांपासून गाळ उपसालाच नाही. त्यामुळे खोलीकरण करून पाण्याचे सिंचन केले जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात या अभियानातून वाढ होणार आहे. तलाव तेथे मासोळी ही शासनाची योजना न राहता लोकसहभागातून आर्थिक उन्नतीची चळवळ झाली पाहिजे. मत्स्यव्यवसायासाठी पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध करून देऊ. परंतु व्यवसाय करणाऱ्यांनी पैशांचा योग्य विनियोग केला पाहिजे असे मार्गदर्शन केले.
आमदार परिणय फुके यांनी शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढविण्याशी मत्स्यव्यवसाय व दुग्ध व्यवसाय हे पुरक व्यवसाय शास्त्रोक्त करण्यासाठी शासन स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न करू. असे आश्वासन दिले. मच्छीमार सोसायटीचे संजय केवट यांनी मत्स्यव्यवसायीकांच्या समस्या मांडल्या.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अभिषेक नामदास यांनी केले. तर आभार उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.