मजुराचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: June 15, 2017 00:14 IST2017-06-15T00:14:53+5:302017-06-15T00:14:53+5:30
आंबाडी येथील मोलमजूरी करणारा मजूर उत्तम तुंबळे (३८) यांचा ब्रम्ही येथील शैलेश वैरागडे यांच्या शेतात संशयास्पद मृत्यू झाला.

मजुराचा संशयास्पद मृत्यू
तीन दिवस मृतदेह शेतात : कपाळ व नाकावर रक्ताचे डाग
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : आंबाडी येथील मोलमजूरी करणारा मजूर उत्तम तुंबळे (३८) यांचा ब्रम्ही येथील शैलेश वैरागडे यांच्या शेतात संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शेतात धुऱ्या लगत सडलेल्या अवस्थेत ११ जुनला आढळला. उत्तम तुंबळेचा मृत्यू अपघाती झाला की त्याची हत्या करण्यात आली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
आंबाडी गावातील श्रीकृष्ण भोयर यांनी ९ जूनला सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टरने तणीस न्यावयाची आहे, असे सांगून त्यास शैलेस वैरागडे यांच्या शेतावर नेले. तेव्हापासून तो घरी परतला नाही. घरच्यांनी त्याचा शोध घेतला. पण तो कुठेही आढळला नाही. ११ जून रोजी ब्रम्ही येथील शेतकऱ्यांना शेतात दुर्गंधी येते म्हणून त्यांनी शोध घेतला तेव्हा शैलेस वैरागडे यांच्या शेताच्या धुऱ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. पवनी पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल केला. उत्तम तुंबळे यांची पत्नी व भाऊ पद्माकर तुंबळे यांनी शैलेस वैरागडे व घरून बोलावून नेणारा श्रीकृष्ण भोयर यांना मृत्यूचे कारण विचारले पण ते याबद्दल काहीही बोलत नाही म्हणून मृत्यूबद्दल संशय व्यक्त होत आहे. उत्तमच्या मृत्युनंतर त्याचे कुटूंब उघड्यावर पडले आहे. त्यास एक मुलगी व एक मुलगा आणि पत्नी आहे. उत्तमचा भाऊ पद्माकर तुंबळे यांनी भावाच्या संशयास्पद मृत्युस शैलेस वैरागडे व श्रीकृष्ण भोयर हे जबाबदार आहेत असा आरोप केला आहे. या प्रकरणातील दोषीची चौकशी करून त्यांना पोलिसांनी अटक करण्याची मागणी केली आहे. मृतकाच्या नाकाला व कपाळाला जखम होती, हे विशेष.