बाळंतिणीचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: October 7, 2014 23:28 IST2014-10-07T23:28:35+5:302014-10-07T23:28:35+5:30
लाखांदूर येथील एका महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारला तिची प्रसूती झाली. मात्र उपचार सुरू असतानाच या बाळंतिण मातेचा मंगळवारला पहाटे मृत्यू झाला.

बाळंतिणीचा संशयास्पद मृत्यू
सामान्य रुग्णालयातील प्रकार : संतप्त नातेवाईकांनी दिला पतीला चोप
भंडारा : लाखांदूर येथील एका महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारला तिची प्रसूती झाली. मात्र उपचार सुरू असतानाच या बाळंतिण मातेचा मंगळवारला पहाटे मृत्यू झाला. कालपर्यंत व्यवस्थित असताना तिचा अचानक मृत्यू कसा झाला यामुळे वातावरण गंभीर बनले होते.
रिना हरीश पिल्लेवान (२३) रा. लाखांदूर असे मृत महिलेचे नाव आहे. रिनाच्या मृत्यूला पती जबाबदार असल्याच्या कारणावरून त्याला रूग्णालय परिसरात संतप्त नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर रिनाचा मृतदेह लाखांदूरला सासरी नेत असताना तिच्या तोंडातून फेस बाहेर निघाला, त्यामुळे तिचा मृतदेह लाखांदूर पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तिथून परत भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला.
साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथील दिलीप मेश्राम यांची मुलगी रिना हिचा लाखांदूर येथील हरीश जगदीश पिल्लेवान याच्याशी १ जून २०१३ ला विवाह झाला होता. प्रसूतीसाठी तिला लाखांदूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तिथे तीन दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
भंडारा जिल्हा रूग्णालयात शुक्रवाला सिझेरियन शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र मुलगी झाल्याच्या कारणावरून सासरची मंडळी नाराज होती. त्यानंतर हरीशने रिनाच्या आईवडिलांशी शनिवारी रात्री व रविवारी सकाळी प्रसूती वॉर्डातच वाद घातला. प्रसूतीनंतर रिनावर उपचार सुरू होते. तिची प्रकृती चांगली होती. मात्र मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास रिनाची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तिचा मृत्यू झाला. यानंतर रूग्णालय प्रशासनाने तिच्या मृत्यूचे नेमके निदान न करता मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो गाडीत ठेवला.
यावेळी वॉर्डातील अन्य रूग्णांच्या नातेवाईकांनी रिनाच्या मृत्यूस पती हरीश जबाबदार असल्याचा आरोप मृतक रिनाचे वडील दिलीप व नातेवाईकांनी केला. दरम्यान, रिनाचा मृतदेह सासरी लाखांदूर येथे नेण्यात आला. मात्र वाटेत मृतकाच्या तोंडातून फेस बाहेर येत असल्याने मृतकाचे वडील व अन्य नातेवाईकांचा संशय बळावला. मृतदेह सासरी न नेता त्यांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात नेला. याप्रकरणी सासरकडील मंडळींच्या नावाने गुन्हा नोंदविण्याची मागणी रिनाच्या वडिीाांनी केली. ठाण्यात परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलीस निरीक्षकांनी सतर्कता बाळगून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. (शहर प्रतिनिधी)