बदल्यांना स्थगनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2015 01:22 IST2015-05-20T01:22:41+5:302015-05-20T01:22:41+5:30

आर.टी.ई. अ‍ॅक्ट मधील तरतुदीनुसार शिक्षकांच्या पदनिश्चितीबाबत कार्यवाही पूर्ण होत नाही ...

Suspension of transfers | बदल्यांना स्थगनादेश

बदल्यांना स्थगनादेश

तुमसर / पवनी : आर.टी.ई. अ‍ॅक्ट मधील तरतुदीनुसार शिक्षकांच्या पदनिश्चितीबाबत कार्यवाही पूर्ण होत नाही तथा न्यायालयाकडून जैसे थे परिस्थितीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून यात आपसी बदल्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये, असा आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना ग्रामविकास मंत्रालयाने दिला आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभागाने १८ मे ला राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश निर्गमित केले. यात आपसी बदल्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रशासकीय, विनंती बदल्या, आंतरजिल्हा, बदल्या करण्यात येऊ नयेत, असा आदेश आहे. १८ मे २०१५ पूर्वी ज्या जिल्हा परिषदांतर्गत शिक्षकांच्या आपसी बदल्या व्यतिरिक्त जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदल्या झाल्या असल्यास त्या बदल्या स्थगित करण्यात याव्यात असे आदेशात नमूद केले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक पीटीआर १११३ दि. १३ डिसेंबर २०१३ अन्वये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर, विद्यार्थी-शिक्षक यांचे प्रमाण विचारात घेवून शिक्षकांची सेवा उपलब्ध करून देणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांची जिल्हानिहाय मंजूर पदांची संख्या कमी होत असल्याने शिक्षक संघटनांनी याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने ३१ डिसेंबर २०१४ रोजी सुनावणी होवून १३ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयास जैसे थे परिस्थिती ठेवण्याबाबत निर्णय दिलेला आहे. परिणामी २०१४-१५ संच मान्यता पूर्ण झालेली नाही.
त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, मुख्याध्यापक पदोन्नती, पदावनती, पदवीधर शिक्षक पदोन्नती इत्यादी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याने सद्यस्थितीत आपसी बदली वगळता इतर बदल्या करणे अडचणीचे होत असल्याचे सर्वसाधारण सर्व जिल्ह्यात परिस्थिती आहे, असा अभिप्राय शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांनीही शासनास कळविला होता, असे ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुळवे यांनी आदेशात नमूद केले आहे.
१६ मे रोजी खासदार नाना पटोले व आमदार वाघमारे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना भ्रमणध्वनीवर शिक्षकाच्या बदली प्रकरणात अनियमिततेची तक्रार केल्याने मुंडे यांनी दखल घेण्याची हमी दिली होती, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Suspension of transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.