निलंबित करा; अन्यथा घेराव

By Admin | Updated: September 18, 2016 00:34 IST2016-09-18T00:34:50+5:302016-09-18T00:34:50+5:30

भंडारा वनविभागांतर्गत येथील अधिकाऱ्यांनी संगनमत करून परवानगीविना वृक्षांची कटाई केली.

Suspend; Otherwise gherao | निलंबित करा; अन्यथा घेराव

निलंबित करा; अन्यथा घेराव

प्रकरण वनविभागातील वृक्षकटाईचे : वनमंत्र्यांना दिले निवेदन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा
भंडारा : भंडारा वनविभागांतर्गत येथील अधिकाऱ्यांनी संगनमत करून परवानगीविना वृक्षांची कटाई केली. याप्रकरणात अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार समोर येत आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा घेराव घालण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सदर निवेदन पाठविले आहे. या निवेदनात त्यांनी भंडारा उपवन संरक्षक कार्यालयातील वृक्षांची विनापरवानगी कटाई केल्याचे गंभीर प्रकरण असून यात दोषी अधिकाऱ्याला पाठीशी घालीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. उपवनसंरक्षण कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयात असलेल्या वृक्षांची नगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही. असे असतानाही अधिकाऱ्यानी पदाचा दुरूपयोग करून ८० सागवान वृक्ष व १२९ आडजात वृक्षांची तोड केल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सदर अधिकाऱ्यांनी लाखो रूपयांची विल्लेवाट लावल्याचाही संशय विजय शहारे यांनी व्यक्त केला आहे.
भंडारा येथील वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांच्या वर्षभराच्या कारकिर्दीत अनेक गंभीर प्रकरणे घडल्याचाही संशय व्यक्त होत आहे. वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च वनविभाग करीत असताना येथील वृक्षांची सर्रासपणे तोड करण्यात आली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणात प्रथमदर्शनी वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम हे दोषी आढळून येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उपवनसंरक्षक कार्यालयाने गंभीर दखल घेवून चौकशी करणे गरजेचे आहे. मात्र एवढ्या दिवसाचा कालावधी लोटलानंतरही सदर विभागाने कुठलीही दखल घेतलेली दिसून येत नाही. यासोबतच कोका विश्रामगृहाचे लाकूड साहित्यही मेश्राम यांनी स्वत:च्या शासकीय वसाहतीत ठेवून त्या साहित्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा घाट घातला असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
शुल्लकशा कारणावरून दोन वनकर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. सागवान वृक्ष कटाई व लाकूड साहित्यांची विल्हेवाट लावण्याचे गंभीर प्रकरण समोर आले असतानाही दोषी अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने आठवडाभरात या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास मनसे स्टाईल घेराव आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष शहारे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य वनसंरक्षक नागपूर, उपवनसंरक्षक भंडारा यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

लोकमतच्या वृत्ताची मनसेकडून दखल
भंडारा वनविभागांतर्गत सागवन वृक्ष कटाई व लाकूड साहित्यांची अफरातफर प्रकरणाची वृत्तमालिका 'लोकमत'मध्ये प्रकाशित होत आहे. याची दखल यापूर्वी महाराष्ट्र वनपाल व वनरक्षक संघटनेने घेवून याची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता या गंभीर प्रकरणाची दखल मनसेने घेतली असून लोकमतमध्ये प्रकाशित होत असलेल्या वृत्तमालेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याने वनविभाग काय भूमिका घेते याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

वनसंवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनाधिकाऱ्यांनी नियम पायदळी तुडविल्याचा प्रकार आहे. दोषींना निलंबना ऐवजी पाठिशी घालीत असल्यास खपवून घेणार नाही.
-विजय शहारे,
जिल्हाध्यक्ष, मनसे.

Web Title: Suspend; Otherwise gherao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.