मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निलंबित करा
By Admin | Updated: November 5, 2015 00:39 IST2015-11-05T00:39:41+5:302015-11-05T00:39:41+5:30
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी वरठी येथे आंदोलन करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निलंबित करा
पंचायत समितीवर मोर्चा : ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची मागणी
मोहाडी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी वरठी येथे आंदोलन करण्यात आले. तथापि, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी शासनादेश, परिपत्रकांच्या विरोधात कारवाई केली. त्या विरोधात व अन्य मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने पंचायत समिती मोहाडीवर मोर्चा काढण्यात आला. यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा लागू केला असून वेळोवेळी सुधारित किमान वेतन संबंधित ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे याची अंमलबजावणीची जबाबदारी व परिपत्रकाप्रमाणे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेवर दिली आहे. तथापि, वरठी ग्रा.पं. च्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करण्यात आले नाही. किमान वेतन देण्यात यावा यासाठी वरठीच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण केले होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी निंबाळकर यांनी वरठी येथे येवून शासनाचे आदेश, परिपत्रक यांच्या विरोधात कृती केली तसेच संघटनेच्या नेत्यांना अपमानितही करण्यात आले. ग्रा.पं. वरठी येथील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान करण्यात आलेले व्यवहाराबाबत त्यांना निलंबित करण्यात यावे असे पत्र विभागीय आयुक्त नागपूर यांना देण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा यांच्यावर कारवाई करावी तसेच ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यात यावे, राहणीमान भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, सर्व ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी व महिन्याचे वेतन व बोनस देण्यात यावा आदी मागण्यांसाठी गुरुवार बाजार मोहाीड येथून ग्रा.पं. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव बांते, कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, तालुका सचिव गजानन लाडसे, विनोद पटले, शिवशंकर खंगार, जयप्रकाश मेहर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. पं.स. समोर मोर्चा धडकला. तिथेच सभा घेण्यात आली. सभेनंतर मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकारी पंकज भोयर यांना शिष्टमंडळाने दिले. (तालुका प्रतिनिधी)