सूर्यनारायण कोपला; भंडारा ४५.५ अंशावर
By Admin | Updated: May 20, 2015 01:21 IST2015-05-20T01:21:14+5:302015-05-20T01:21:14+5:30
दोन दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून जनजीवन प्रभावित झाले आहेत.

सूर्यनारायण कोपला; भंडारा ४५.५ अंशावर
भंडारा : दोन दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून जनजीवन प्रभावित झाले आहेत. सोमवार आणि मंगळवार या वर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वात 'हॉट' दिवस ठरला आहे. काल सोमवारी ४३.५ अंश तापमानाची नोंद केल्यानंतर आज पुन्हा तापमानात वाढ दिसून आली. आजचे कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गत २४ तासात तापमानात दोन अंशाने वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा आबाल वृद्धांसह सर्वांनाच फटका बसला आहे.
सकाळी ८ वाजतापासूनच सुर्याच्या उष्णतेत प्रखरता जाणवत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत रहदारी असलेले रस्ते निर्मनुष्य दिसत आहे. सायंकाळी ५ वाजतापर्यंत तिच स्थिती होती. रस्त्यांवर तथा बाजारपेठेत शुकशुकाट होता. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. पाणपोई व शितपेयांच्या दुकानात नागरिकांची गर्दी दिसून आली. उष्णतेपासून बचाव करता यावा यासाठी नागरिक धडपड करीत असल्याचे दिसले.
एप्रिल महिन्याच्या अखेरपासून उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच उन्हाच्या काहिलीने नागरिकांसह वन्यप्राण्यांची ससोहोलपट सुरू होत असते. मागील तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याचे निदर्शनात आले. आजचा दिवस सर्वाधिक उष्णतेचा ठरला आहे. गत बारा दिवसातील तापमानाचा हा उच्चांक आहे. वैशाख महिन्याच्या सुरूवातीपासूनच उष्णतेची प्रखरता जाणवू लागली आहे. तापमानात मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्याचे तापमान ४३ अंशापर्यंत पोहचले होते. मात्र, आज तापमानाची तिव्रता अधिक होती. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. दि. ७ मे रोजी ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून हवामानात अनपेक्षित बदल होऊन जानेवारी ते एप्रिलपर्यंत वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. त्यामुळे तापमानात खंड पडून दमट वातावरणच जास्त राहिले आहे. मात्र, वैशाख महिना सुरू होताच तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा पल्ला गाठला. तो अद्याप स्थिर आहे. (प्रतिनिधी)