नवल! टी.सी. द्या, सायकल घेऊन जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:24+5:302021-04-01T04:35:24+5:30
तुमसर : तुमसर शहर व तालुक्यात शाळा वाचविण्याकरिता वर्ग ५ व ८ च्या विद्यार्थ्यांकरिता काही शाळांनी ‘टी.सी. द्या, सायकल ...

नवल! टी.सी. द्या, सायकल घेऊन जा!
तुमसर : तुमसर शहर व तालुक्यात शाळा वाचविण्याकरिता वर्ग ५ व ८ च्या विद्यार्थ्यांकरिता काही शाळांनी ‘टी.सी. द्या, सायकल घेऊन जा’ अशी मोहीम सुरू केल्याची धक्कादायक माहिती आहे. मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी शिक्षकांना तसे फर्मान सोडले आहे. कोरोनाच्या सावटात शिक्षकांची गावोगावी भटकंती सुरू आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शिक्षक कोरोनावाहक बनून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुमसर शहरात सीबीएससी पॅटर्नच्या शाळांची संख्या जास्त आहे. तिथे विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. शहरात अनुदानित शाळांची संख्याही मोठी आहे. त्यांना शाळा टिकवून ठेवण्याकरिता विद्यार्थ्यांची गरज आहे. वर्ग ५ व वर्ग ८ ची तुकडी वाचवण्याकरिता मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची गरज आहे.
टी.सी. मिळावे याकरिता शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांना सायकलचे आमिष दाखवले आहे. यासोबत विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकेही दिली जातील, असे सांगितले जाते. शहरातील अनेक शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या टी.सी. करिता ग्रामीण भागात भटकंती सुरू आहे. काही पालकांना नगदी, तर काही पालकांना सायकल पुरविण्यात येण्याची हमी दिली जात आहे. हा सर्व खर्च शिक्षक सामूहिक रितीने करीत असल्याची माहिती आहे. याकरिता शाळांना लाखोंच्या खर्च अपेक्षित आहे. शिक्षकांना नोकरी टिकविण्याकरिता नाईलाजास्तव टी.सी.करिता पैसा उभा करावा लागत आहे.
संस्थाचालकांचे फर्मान :
शाळेची तुकडी शाबूत रहावी, याकरिता संस्थाचालकांनी शिक्षकांना टी.सी. जमा करण्याकरिता फिरण्याचे फर्मान सोडले आहे. टी.सी.करिता पैसाही तुम्हीच खर्च करावा, असा धाक दाखविण्यात येत आहे.
यात मुख्याध्यापक व संस्थाचालकांची मुख्य भूमिका आहे. शिक्षक नाईलाजाने त्यांचे आदेश पाळत आहेत. यामुळे प्रत्येक शिक्षकावर २० ते ३५ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. संस्थाचालकांविरोधात कोण जाईल, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. ज्या शिक्षकांनी विरोध केला, त्याला निलंबित करण्याची तंबी देण्यात आल्याची माहिती आहे.
शिक्षण विभागाचे दुर्लक्ष :
तुमसर शहर व तालुक्यात टी.सी. खरेदी जोमात सुरू असताना, शिक्षण विभागाचे मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष दिसत आहे. याबाबत शिक्षण विभागाला ही माहिती आहे. परंतु तेही मूग गिळून गप्प आहेत. तालुका स्तरावरील असलेल्या शिक्षण विभागाचे अधिकारी यांना ही सर्व माहिती असताना अजूनपर्यंत कोणतीच चौकशी करण्यात आली नाही. शिक्षकांची होणारी पिळवणूक कोण थांबवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागातील अधिकारी केवळ कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानत आहेत.
शिक्षक बनत आहे.
बॉक्स
शिक्षक फिरताहेत दारोदारी
विद्यार्थ्यांच्या टी.सी.करिता शहरात वास्तव्याला असणारे शिक्षक दररोज ग्रामीण भागांमध्ये फिरत आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यापूर्वी काही शिक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. गावात जाऊन शिक्षक पालकांच्या भेटी घेतात, त्यामुळे एखादा शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्यास गावातील नागरिक कोरोना संक्रमित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षक कोरोना वाहकाच्या भूमिकेत सध्या वावरत असल्याचे दिसून येते. जिल्हाधिकाऱ्यांनी येथे लक्ष घालून योग्य चौकशी करून संबंधित शाळांवर कारवाई करण्याची गरज आहे.