शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा
By Admin | Updated: October 26, 2015 01:02 IST2015-10-26T01:02:52+5:302015-10-26T01:02:52+5:30
शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच विशेष चर्चेत राहणारे किसान गर्जनेचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी गोंडसावरी येथे उपोषणकर्त्यांना भेटून त्यांना पाठिंबा दिला.

शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा
राजेंद्र पटले : शेतमालाला भाव देण्याची मागणी
भंडारा : शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच विशेष चर्चेत राहणारे किसान गर्जनेचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी गोंडसावरी येथे उपोषणकर्त्यांना भेटून त्यांना पाठिंबा दिला. शासनाच्या शेतकरी विरोधी कृत्याचा समाचार घेतला. चांगले दिवस आणण्यासाठी शेतकऱ्यांनी शासन बदलविले. परंतु शेतकऱ्यांची दिशाभूल झाली. पूर्वीच्या शासन काळात जे शेतमालास भाव मिळत होते त्याच्याहीपेक्षा या शासन काळात खूप कमी भाव मिळत आहे. यावर्षी भंडारा जिल्ह्यात धानावर खूप कीड लागली आहे. अनेकदा फवारणी करून सुद्धा कीड संपुष्टात येत नाही आहे.
महाग औषधीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. पुन्हा फक्त सहा तास थ्री फेज विद्युत शेतकऱ्यांना मिळत आहे. ते ही मुद्दाम शेतकऱ्यांना खूप त्रास व्हावा म्हणून रात्रीच्या १२ वाजता विद्युत सुरु करण्यात येते. त्यामुळे अनेक शेतकरी रात्रभर झोपत नाहीत. अदानी पॉवर प्रकल्प निव्वळ दुसऱ्या राज्यांना वीज विकण्यासाठीच निर्माण करण्यात आला आहे काय? की भोळ्या शेतकऱ्यांना मुर्ख बनविण्यासाठी? हा चिंतेचा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
मग विश्वास करावा तर कुणावर करावा? शेतकऱ्यांच्या हिताचे शासन या कृषिप्रधान देशात केव्हा येईल? अनेक उद्योगपती, व्यवसायी, अधिकारी, कर्मचारी यांचा विचार होतो. यांच्यासाठी स्मार्ट शहरे बनविण्याची तयारी होत आहे. दरवर्षी बोनस दिल्या जाते पण स्मार्ट शेतकरी बनविण्याची मुळातच शासनाची इच्छा नाही ही कृषिप्रधान देशात शोकांतिका आहे असे शेतकरी नेते राजेंद्र पटले यांनी गोंडसावरी येथील शेतकऱ्यांना सांगितले. जर खरच पुढे शेतकऱ्यांवर असाच अन्याय होत राहील तर मग उग्र रुप धारण करून विराट स्वरुपाचा जनआंदोलन करून मुंबई, दिल्ली हालवण्यात येईल. यांची शासनाने गंभीर दखल घ्यावी असा इशारासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत राजेंद्र पटले यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)