शाळेला निकृष्ट तूर डाळीचा पुरवठा
By Admin | Updated: November 4, 2014 22:34 IST2014-11-04T22:34:16+5:302014-11-04T22:34:16+5:30
सिहोरा परिसरातील सुकळी (नकुल) येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत निकृष्ट तूर डाळीचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार

शाळेला निकृष्ट तूर डाळीचा पुरवठा
डाळ शिजत नाही : पुरवठाधारकांचा मुजोर कारभार, कारवाई होणार काय?
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील सुकळी (नकुल) येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत निकृष्ट तूर डाळीचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असल्याच्या कारणावरून व्यवस्थापन समितीने मध्यान्ह भोजन वाटपातून तूर डाळ बंद केली आहे.
ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी शासन स्तरावर अनेक कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु या उपक्रमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेली आहेत. सिहोरा परिसरातील सुकळी (नकुल) येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत १ ते ७ तुकड्या आहेत. या तुकड्यात १५४ विद्यार्थी आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना नियमित मध्यान्ह भोजन वाटप करण्यात येत आहे. परंतु गेल्या महिना भरापासून मध्यान्ह भोजनातून तूर डाळ गायब झाली आहे. शालेय व्यवस्थापन तथा शिक्षकवृंद दोषी नसतानाही त्यांना जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना सकस आहार म्हणून तूर डाळ देण्याची ओरड पालक करीत आहेत. परंतु निकृष्ट तूर डाळ पुरवठा करण्यात आल्याच्या कारणावरून शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ‘टेंशन’मध्ये आलेली आहेत.
राज्यात जिल्हा परिषद शाळांना मध्यान्ह भोजनासाठी लागणारा सकस आहाराचा पुरवठा करण्याचे कंत्राट महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटीव्ह कंझुमर्स फेडरेशन लि. मुंबई यांना देण्यात आले आहे. विभागीय कार्यालय नागपुरातील सीताबर्डी परिसरात अपना भंडार नावाने आहे. या कार्यालय अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळांना सकस आहार पुरवठा करण्याचे कंत्राट गोंदियाचे आदित्य अग्रवाल नामक इसमांना देण्यात आले आहे. गेल्या २६ सप्टेंबरला सुकळी (नकुल) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात तुर डाळ वाटपासाठी देण्यात आली आहे. १ ते ४ तुकड्यासाठी १५ किलो आणि ५ ते ७ तुकड्यासाठी २० किलो अशी एकूण ३५ किलो आहे. ही तूर डाळ तुमसरच्या अग्रवाल नामक इसमामार्फत पुरवठा करण्यात आली आहे. दरम्यान आधी २-३ दिवस मध्यान्ह भोजनात ही तुर डाळ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे. भोजनात वरणाची दुर्गंधी येत असल्याने विद्यार्थ्यांनी या संदर्भात शिक्षकांना सांगितले आहे. सदर तुर डाळ शिजत नाही असा प्रकार लक्षात येताच मध्यान्ह भोजनातून ही तूर डाळ वाटप करणे बंद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी सकस आहारापासून वंचित झाली आहेत.
सद्यस्थितीत तूर डाळ शिजविणे बंद करण्यात आले आहे. या डाळीच्या भोजनात उपयोग केल्यास उलट्या तथा आजार पण आल्याचे विद्यार्थ्यांतू लक्षणे दिसत असल्याच्या कारणावरून शालेय व्यवस्थापन समितीने या निकृष्ट तूर डाळीला सिलबंद केली आहे.
दरम्यान या संदर्भात तुमसरच्या अग्रवाल नामक इसमाला व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारले असता त्यांनी सांगितले, या तूर डाळीच्या संदर्भात माहिती नसून आपण फक्त पुरवठाधारक आहोत. गोंदियावरून सकस आहार पुरवठा होत असल्याची माहिती दिली. दरम्यान पंचायत समिती तथा जिल्हा परिषद पर्यंत या तूर डाळीची माहिती देण्यात आली असली तरी चौकशी आणि कारवाई शून्य आहे. अद्यापपर्यंत निकृष्ट तूर डाळीची उचल करण्यात आली नाही. तथा नव्याने तूर डाळीचा पुरवठा करण्यात आलेला नसून गोंदिया येथील पुरवठाधारकांचा मुजोर कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. (वार्ताहर)