जिल्हा परिषदेकडून ‘लिकेज’ डोंग्याचा पुरवठा
By Admin | Updated: July 13, 2015 00:44 IST2015-07-13T00:44:53+5:302015-07-13T00:44:53+5:30
भंडारा जिल्हा परिषदेने माडगी (तुमसर) घाटावर नवीन डोंग्याचा पुरवठा केला, परंतु तो डोंगा लिकेज असून त्याच्यात तांत्रिक त्रुट्या असल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषदेकडून ‘लिकेज’ डोंग्याचा पुरवठा
सांगली येथून आला डोंगा : माडगी नदीपात्राकरिता केला पुरवठा, अधिकाऱ्यांनी केला पंचनामा
तुमसर : भंडारा जिल्हा परिषदेने माडगी (तुमसर) घाटावर नवीन डोंग्याचा पुरवठा केला, परंतु तो डोंगा लिकेज असून त्याच्यात तांत्रिक त्रुट्या असल्याची माहिती आहे. येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला. घाटकुरूडा घटनेची येथे शासनाला विसर पडल्याचे दिसून येते.
माडगी नदीपात्रात आयुष्य संपलेल्या डोंगा अखेरची घटका मोजत आहे. उमरवाडा-घाटकुरूडा येथील घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. त्या अनुषंगाने भंडारा जिल्हा परिषदेने माडगी घाटाकरिता नवीन डोंगा साठविला. सांगली येथून हा नवीन डोंगा मागविण्यात आला त्याची किंमत एक लाख असल्याची माहिती आहे. नदीपात्रात या डोंग्याची चाचणी घेण्यात आली. डोंगा लिकेज असल्याने त्यात पाणी भरणे सुरू झाले. तसेच डोंगा पाण्यात काही इंच जात नाही उलट पाण्यावरच तरंगतो त्यामुळे त्याच्यात तांत्रिक दोष असल्याचे कोळी बांधवांनी सांगितले. हा डोंगा असुरक्षित असून त्याला परत करण्याची गरज आहे.
सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषदच्या अभियंत्यांनी या डोंग्याचा पंचनामा तयार केला. अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात एक डोंगा व आंबोरा येथे चार मिनी बोट देण्यात आल्या अशी माहिती आहे.
विना प्रात्यक्षिक व चाचणी विना हे साहित्य कसे आले असा प्रश्न येथे उपस्थित होतो. डोंग्याच्या खरेदीकरिता कोण गेले होते, कशा एजेन्सीकडून ते मागविण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे. उमरवाडा-घाटकुरूडा घटनेपासून शासनाने काही बोध घेतला नाही, असे दिसून येते. सध्या माडगी घाटावर जुन्याच डोंग्याचा वापर सुरू आहे हे विशेष. जिल्हा परिषदेत सत्ता येताच नवनियुक्त पदाधिकारी काय कारवाई करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)