सनफ्लॅग व्यवस्थापन नरमले; संपाचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:21 IST2021-03-29T04:21:55+5:302021-03-29T04:21:55+5:30
वरठी : सनफ्लॅग व्यवस्थापनाच्या मोेगलाई धोरणाने त्रस्त कामगार संघटनांनी १३ मार्चपासून बेमुदत संप पुकारले. दरम्यान, कामगारांच्या मागण्यांना तुडवीत ...

सनफ्लॅग व्यवस्थापन नरमले; संपाचा तिढा सुटला
वरठी : सनफ्लॅग व्यवस्थापनाच्या मोेगलाई धोरणाने त्रस्त कामगार संघटनांनी १३ मार्चपासून बेमुदत संप पुकारले. दरम्यान, कामगारांच्या मागण्यांना तुडवीत लोकप्रतिनिधींना डावलण्याचे काम सनफ्लॅग व्यवस्थापनाने केले. यावर खासदार सुनील मेंढे यांनी तीव्र नापसंती दर्शवली होती. कामगारांच्या लढ्यात सहभागी खासदाराने कामगारांच्या समस्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरबारी मांडल्या. नुसत्या समस्या न मांडता कामगारांची बाजू लढवून सनफ्लॅग व्यवस्थापनावर कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाकडे तक्रार केली. खासदार सुनील मेंढे यांनी केलेली शिष्टाई कामगारांच्या हिताची ठरली. आज नागपूर येथे झालेल्या बैठकीत कामगारांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. १६ दिवसांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर संपाचा तिढा सुटला.
सनफ्लॅगचा पोशिंदा तापत्या उन्हात स्वतःला भाजून कंपनीला मोठा नफा कमवून देतो; पण सनफ्लॅग व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळे त्यांना रस्त्यावर यावे लागले. सनफ्लॅग कामगारांच्या मागण्या तीस वर्षे जुन्या आहेत. तीस वर्षांपासून सदर मागण्या रीतसर पूर्ण करण्यात येतात. कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात त्रैवार्षिक करार व दिवाळी बोनस, अशा विविध मागण्या नेहमीच्या आहेत. कंत्राटी कामगारांना किमान वेतन यासह अनुभवानुसार स्थायी कामगार करणे व भविष्य निर्वाह निधी कपात, हे सरकारचे धोरण आहे. संपादरम्यान कामगारांनी केलेल्या मागण्यांत एकही मागणी नवीन नाही. यासाठी कंत्राटी कामगार संघटनांशी व्यवस्थापनाने लेखी करार केला होता; पण त्यावर चार वर्षांत अंमलबजावणी झाली नाही. सनफ्लॅग व्यवस्थापनप्रमुख म्हणून एस.के. गुप्ता यांच्याकडे कारभार आहे. एस.के. गुप्ता यांच्या कार्यप्रणालीमुळे कामगारांत असंतोष आहे. ते आपल्या विचित्र स्वभावाने कामगारांत परिचित आहेत.
नफ्याच्या कंपनीला कामगारांचे हक्क मारून अजून नफा कसा कमवायचा, यावर त्यांचा भर आहे. कामगारांच्या पारंपरिक कराराला बगल देत त्यांनी नवनवीन नियम अमलात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला. नफ्याची कंपनी डबघाईस आणून मालकीहक्क बजावण्याचे त्यांचे धोरण होते. यामुळे कामगारांना संपावर जावे लागले. कामगारांनी पुकारलेला संप त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे घडला. कामगारांच्या हक्काचे हनन व शोषण करण्यात ते पटाईत आहेत.
कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला खासदार सुनील मेंढे यांनी गंभीरतेने घेतले होते. यासाठी स्वतः कामगार संघटना व व्यवस्थापन अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली; पण यात व्यवस्थापन सर्वेसर्वा एस.के. गुप्ता यांनी खेळ रचला. अधिकार नसलेले अधिकारी रामचंद्र दळवी व सतीश श्रीवास्तव यांना चर्चेसाठी पाठवले.
यात रामचंद्र दळवी यांनी खासदार व शिष्टमंडळाला उडवाउडवीची उत्तरे दिली. यावर खासदार मेंढे यांनी दिल्ली दरबारी मालकासोबत बैठक घडवून आणली. आज १६ दिवसांच्या प्रदीर्घ प्रयत्नांनंतर खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नांना यश आले. दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार सुनील मेंढे, कामगार संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद देशपांडे, कंपनीचे मालक प्रणव भारद्वाज, एस.के. गुप्ता व सतीश श्रीवास्तव यांच्यासह दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक सुरू होती. दोन दिवसांच्या बैठकीनंतर आज सायंकाळी संपाचा तिढा सोडविण्यात आला. कामगारांच्या मागण्या सशर्त मंजूर करण्यात आल्या.