उन्हाळी हंगाम संकटात, विजेचे संकट लय भारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST2022-04-07T05:00:00+5:302022-04-07T05:00:48+5:30
जिल्ह्यातील शेतकरी बाराही महिने भारनियमनात शेती कसतो आहे. २४ तासांपैकी केवळ आठ तास वीज दिली जाते. या आठ तासातही रात्र पाळीत चार तर दिवस पाळीत तीन दिवस वीज मिळते. यात आणखी काही बिघाड आल्यास वीज खंडित होते. त्यामुळे अपेक्षित असलेली आठ तास वीजसुद्धा कृषी फिडरला मिळणे दुरापास्त झाले आहे. वातावरणातील बदलामुळे एप्रिल महिन्यात मे हिट झाले आहे. पारा ४२ अंशांच्या घरात पोहोचला आहे.

उन्हाळी हंगाम संकटात, विजेचे संकट लय भारी!
मुखरू बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : तापमान वाढताच विजेचे संकट वाढत आहे. मागणी आणि पुरवठ्याचे नियोजन बिघडल्याने कृषी फिडरवर अत्यावश्यक अर्थात इमर्जन्सी भारनियमन सुरू झाले. परिणामी पुरेशा पाण्याअभावी उन्हाळी हंगाम संकटात सापडला आहे. रात्री वीजपुरवठा होत असल्याने अख्खी रात्र शेतकऱ्यांना जागून काढावी लागत आहे. बुधवारी तर अत्यावश्यक भारनियमनाच्या नावाखाली केवळ दोन ते तीन तासच वीज शेतकऱ्यांना मिळते.
जिल्ह्यातील शेतकरी बाराही महिने भारनियमनात शेती कसतो आहे. २४ तासांपैकी केवळ आठ तास वीज दिली जाते. या आठ तासातही रात्र पाळीत चार तर दिवस पाळीत तीन दिवस वीज मिळते. यात आणखी काही बिघाड आल्यास वीज खंडित होते. त्यामुळे अपेक्षित असलेली आठ तास वीजसुद्धा कृषी फिडरला मिळणे दुरापास्त झाले आहे. वातावरणातील बदलामुळे एप्रिल महिन्यात मे हिट झाले आहे. पारा ४२ अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात पिकांना पाणी अधिक लागत आहे. आठ तासाच्या विजेत शक्य तेवढे सिंचन करण्याचा प्रयत्न शेतकरी करतो आहे. मात्र नियमित असलेली आठ तास वीज सुद्धा मिळत नाही. अत्यावश्यक भारनियमनामुळे स्थानिक वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही काही चालत नाही. वास्तव परिस्थिती त्यांच्या लक्षात असूनही वरिष्ठांच्या आदेशापुढे त्यांना काही करता येत नाही. मात्र यात शेतकरी भरडला जात आहे, तेवढेच खरे! शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही घट होत असून सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी आहे.
शेतकऱ्यांच्याच माथी भारनियमन का?
- राज्यात विजेचे संकट उभे झाल्याचे खुद्द वीज मंत्र्यांनीच सांगितले. तरीही भारनियमन होणार नसल्याची ग्वाही दिली होती; मात्र इमर्जन्सी भारनियमन करीत शेतकऱ्यांना विजेचा झटका दिलेला आहे. भारनियमन केवळ शेतकऱ्यांच्या माथी का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मात्र याबाबत कुणीही समाधानकारक उत्तर देत नाहीत.
वरिष्ठांच्या आदेशानुसार रात्री ३ वाजता अत्यावश्यक भारनियमन करण्यात आले. हे भारनियमन नियमित नाही. तुटवड्यामुळे एखादवेळेस केले जाऊ शकते. कृषी फिडरच्या वेळापत्रकानुसारच शेतकऱ्यांना वीज मिळत आहे.
-मयंक सिंग,
सहायक अभियंता, पालांदूर.