उन्हाळी धानावर किडीचे संकट; कृषी विभागाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: May 12, 2015 00:29 IST2015-05-12T00:29:35+5:302015-05-12T00:29:35+5:30
जिल्ह्यात हजारो हेक्टरवर उन्हाळी धानिपकाची लागवड करण्यात आली आहे.

उन्हाळी धानावर किडीचे संकट; कृषी विभागाचे दुर्लक्ष
भंडारा : जिल्ह्यात हजारो हेक्टरवर उन्हाळी धानिपकाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक ऐन कापणीसाठी तयार होत असताना धानिपकावर कडाकडपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
भंडारा जिल्ह्यातील चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरना आदी धरणाचे पाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येते. हे धरण मोठे असल्याने खरीप हंगामासोबतच उन्हाळी धानिपकासाठीही पाणी दिले जाते. त्यामुळे भंडारा, मोहाडी, तुमसर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रबी पिक काढले जाते. दरवर्षीच मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानिपकाची लागवड करण्यात येते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी अधिक क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली.
दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाचा तडाखा कमी असल्याने धानपीक जोमात आले होते. त्यामुळे यावर्षी चांगले पीक येईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत होता. मात्र अचानक या धानिपकावर कडाकडपा रोगाने आक्रमण केले आहे. लाखनी, पवनी, साकोली, पवनी, भंडारा, मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक भागातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीक धोक्यात आले आहे. या रोगामुळे धानपीक करपल्यासारखे दिसून येत आहे. धानपीक करपल्याने त्याला लागलेले लोंबही भरत नसल्याने उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली. मात्र रोग आटोक्यात न येता हळूहळू त्याच प्रभाव वाढतच चालला आहे. कीटक नाशकांच्या फवारणीवर शेतकऱ्यांचे हजारो रूपये खर्च झाले आहेत. ऐन कापणीसाठी धान तयार होत असताना कडाकडपा रोगाने आक्रमण केल्याने हातात आलेले धानपीक करपतेवेळी शेतकऱ्यांना बघावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यात उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले जाते. हे धान विकून शेतकरी खरीप हंगामाच्या खर्चाची तजविज करतात. मात्र हजारो रूपये खर्च करूनही धानपीक हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ( प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना बांधावर मार्गदर्शन करा
शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यासाठी गावपातळीवर कृषिसेवक नेमण्यात आले आहेत. मात्र एवढ्या मोठयÞा प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव होऊनही एकही कृषिसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग कृषी केंद्र मालकाला विचारून त्याच्या मार्गदर्शनानुसार फवारणी करीत आहेत. अजूनपर्यंत रोग आटोक्यात आला नाही. अशा संकटाच्या वेळी कृषिसेवक मार्गदर्शन करीत नसतील तर त्यांचा शेतकऱ्यांसाठी काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कृषिसेवकांना बांधावर पाठवून मार्गदर्शन करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.