होळीपूर्वीच उन्हाचे चटके
By Admin | Updated: February 22, 2017 00:32 IST2017-02-22T00:32:43+5:302017-02-22T00:32:43+5:30
फेब्रुवारीच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे.

होळीपूर्वीच उन्हाचे चटके
तापतोय ‘सूर्यनारायण’ : कमाल तापमान ३७ अंशांवर
भंडारा : फेब्रुवारीच्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. मार्च महिन्याला प्रारंभ झालेला नसून होळीपुर्वीच सुर्यदेव तापू लागला आहे. उन्हाळ्यात तापमानाची काय स्थिती असेल ते यावरून दिसून येत आहे.
ऐरवी होळीनंतर उष्णतेत वाढ होत असल्याचे दिसून येते. मात्र यावर्षी उन्हाळ्याची चाहूल लवकरच लागली. वसंतऋतुच्या आगमनासोबतच उन्हाची प्रखरताही वाढू लागली आहे. १ फेब्रुवारीला वसंत पंचमी उत्सव साजरा करीत असताना तापमान ३० ते ३२ अंशांपर्यंत पोहचले होते. मात्र मागील चार दिवसांपासून घराबाहेर पडताना उन्हाचे चटके जाणवू लागले आहे.
किमान तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचल्याने मार्च व त्यानंतरच्या महिन्यात तापमानात वाढ होईल यात दुमत नाही. परंतु आजघडीला सकाळी १० वाजतापासूनच उन्हाची प्रखरता लक्षात घेता मे महिन्यात उन्हाचे चटके अधिक जाणवतील यात शंका नाही. सध्यास्थितीत फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान ३० अंशापर्यंत किंबहूना ३२ अंशापर्यंत नोंदविण्यात येते. मात्र यंदा तापमानाचा पारा ३७ अंशांपर्यंत पोहोचलेला दिसून येत आहे.
होळी सणाला १९ अवधी शिल्लक असताना सुर्यदेव आतापासूनच तापायला लागला आहे. पुढील आठवड्यात १२ वी व त्यानंतर १० वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनाही वाढीव तापमानाचा सामना करावा लागणार आहे. आरोग्य विभागातर्फे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यात येते.
शिवरात्रीपर्वाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पावसाची हजेरी राहायची. मात्र काही वर्षांपासून ही परंपरा मोडीत निघाल्याचे दिसून येते. वातावरणातील बदल व निसर्गात मानवी हस्तक्षेप यामुळे निसर्गचक्र बदलत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याचा फटका वाढीव तापमान या रूपाने जाणवत आहे. दरम्यान येणाऱ्या चार महिने उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)