अवकाळी पावसाचा फटका

By Admin | Updated: March 31, 2015 00:40 IST2015-03-31T00:40:57+5:302015-03-31T00:40:57+5:30

महिन्याभरापूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घालुन शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले होते. दरम्यान गत २४

Sudden rainy season | अवकाळी पावसाचा फटका

अवकाळी पावसाचा फटका

भंडारा : महिन्याभरापूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घालुन शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले होते. दरम्यान गत २४ तासात पुन्हा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांची प्रचंड गोची केली आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. निसर्ग जगू देत नाही व शासन मरू देत नाही अशा स्थितीत बळीराजा सापडला आहे.
काल रविवारी आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील गहू, हरभरा, जवस, लाखोरी पिकांची नासाडी झाली. आधीच कर्जबाजारी झालेल्या जगाच्या पोशींदावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लाखनी, साकोली, पवनी, तुमसर, मोहाडी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
रात्रंदिवस राबून शेतकरी आपल्या अठराविश्व दारिद्र्याला बाजूला ठेवून यावर्षी शेती करायला लागला. जुन-जुलै महिन्यात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यंदा अल्प प्रमाणात पाणी पडल्याने पुरेशा धानपिके शेतकऱ्यांना घेता आले नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त ही वास्तव स्थिती शेतकऱ्यांची आहे. शिवाय धानपिकाला कवडीमोल किंमत मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला.
खरीप हंगामाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. आता रबी पिकांनाही त्याचा फटका बसला आहे. गहू, हरभरा, जवस, लाखोरी आदी पिके मोठ्या उत्साहाने लावले खरे, मात्र मागील आठ वड्यापासून अवकाळी पाऊस पडत असून उसर्रा, सालई खुर्द, धोप, ताडगाव, सिहरी, मलदा, टाकला, काटेबाम्हणी, सालईबुज, विहीरगाव, भिकारखेडा, टांगा, पालडोंगरी, डोंगरगाव आदी गावांना अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून बळीराजा हवालदिल झाला आहे.
आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट ओढवले आहे. बँक, वित्तीय संस्था, सरकारी पत संस्था याकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. पण पिकांची नासाडी झाली असून मार्च एण्डींगच्या तोंडावर कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे. याशिवाय बँकेचे अधिकारी वसुलीचा तगादा लावत असल्याने शेतकरी चिंतातूर आहे.
वर्षभर अन्न देणाऱ्या या जगाच्या पोशिंदावर आता बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. गत २४ तासातील संपूर्ण अवकाळी पावसाचा सर्वेक्षण करून नुकसान भरपाई केव्हा मिळेल याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहे. (लोकमत चमू)

भाजीपाला जमीनदोस्त
आमगांव : रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके व भाजीपाल जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला आहे. शिंगोरी शिवारातील एका शेतकऱ्याने जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची शेती पिकविली. या पावसाने त्यांच्या शेतात विकण्यायोग्य असलेल्या टमाटरसह अन्य भाजीपाला उत्पादनाची नासाडी झाली आहे. हातातोंडाशी आलेले उत्पादन पावसाने नासाडी केल्याने टमाटर उचलताना शेतकरी कुटुंब. (वार्ताहर)

बळीराजाच्या डोळ्यात अश्रू
चौरास भागात पिकांचे नुकसान

पालोरा : पवनी तालुक्यातील चौरास भागात गेल्या तीन दिवसापासून दररोज अवकाळी पाऊस दिवस व रात्रीच्या वेळी पडत असल्याने शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, उडीद, मूग, वटाणा, मिरची, तूर या पिकाचे जबरदस्त नुकसान झाले. तसेच गावराण आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रब्बी पिक होईल म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरबरा, उळीद, मुंग, लाखोरी, वाटाणा पेरणा पण मागील आठवड्यात तीन वेळा अवकाळी पाऊस पडला. तसेच तीन दिवसात आलटून पालटून अवकाळी पाऊस येत असून रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी उळीद, मुंग, वाटाणा, गहू, लाखोरी यासारखे पिके घेऊन शेतात गोळा करून ठेवले आहे. येत असलेल्या अवकाळी पाऊसाने उळीद, गहू, मुंग, वाटाणा पावसाने ओलेचिंब झाले. त्यामुळे सडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी शेतात उळीद, मुंग, वटाणा, लाखोरीच्या ढिगावर प्लॉस्टिक झाकले पण दररोज पडत असलेल्या अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांच्या हातचे घास हिरावले आहे.
गहू होतोय काळा
भंडारा : अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पिकांची चांगली हानी झाली. गहू, हरभरा, तूर यासह भाजी पिकांचीही नासाडी झाली. खरीप हंगामात धान व इतर पिकांची झालेली नासाडी अजूनही शेतकरी विसरले नाहीत. बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा व गव्हाची शेती फुरविली. त्यांचे या तीन चार दिवसांच्या अवकाळी पावसाने कंबरडे मोडले. पाऊस अधूनमधून पडत आहे. मागील वर्षी झालेल्या नापिकीची नुकसान भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सर्वेक्षण केले जात आहे. त्यातच घोळावर घोळ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असल्याने कुणाला लाभ तर कुणाला भोपळा, अशी स्थिती गेल्या दोन वर्षात झाल्याने नुकसान भरपाई मागायची कुणाला, अशा मन:स्थितीत शेतकरी आला आहे.
भाजीपाला महागला
निसर्गाच्या अवकृपेमुळे हाती आलेला भाजीपाला वाया जात आहे. सध्या ग्रामीण भागात मिरची, भेंडीचा तोडा मोठ्या प्रमाणात सुरू असून असेच पाऊस पडत राहिले तर मिरची व भेंडी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशी चिंता शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे. ऐन तोडणीच्या वेळी पावसाने भाजीपाला खराब झाल्याने व बाजारामध्ये भाजीपाला पुरवठा कमी झाल्याने परिणामी भाज्यांचे भाव कडाडले आहेत. दिवसा उन्हाळा सायंकाळी पावसाळा असा चित्र सध्या सुरू असून जणू निसर्गाचा लपंडाव सुरू आहे.
आरोग्यावर परिणाम
वातावरणातील बदलामुळे विषाणुजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सर्दी, पडसे, ताप, पाठदुखी आदी रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी रुग्णालयात गर्दी वाढत आहे. सध्या राज्यात आधीच स्वाईन फ्लू या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या वातावरणाचा मानवी जीवनावर मोठा बिकट परिणाम होत आहे.

कांदा उत्पादनात घट

चिचाळ : चिचाळ येथील कांद्याची मागील तीन ते चार वर्षापासून मागणी जिल्ह्याशिवाय पर जिल्हयातही वाढली आहे. कांदा हे नगदी पीक असल्याने मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी या उत्पादनाकडे वळला आहे. मात्र अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.
मागील वर्षी चिचाळ येथील कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा जास्त नफा मिळाला. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळले. अंदाजे ५०० एकरामध्ये कांद्याची लागवड केली आहे.
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मुख्यत: धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. तसेच धान निघाल्यानंतर रब्बी पिक म्हणून गहू, हरभरा, वाटाणा, लाख, उळीद, मुंग आदी पीके घेतली जातात व ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी उन्हाळी धान पिक घेत होते. पंरतु धानावर येणारी कीड, महागडे रासायनिक खताचे भाव व धानाला नसलेला भाव यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता.
पंरतु कांदा या पिकाला धानापेक्षा पाणी व खर्च कमी लागत असल्यामुळे चिचाळ येथील शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळले आहेत. मात्र जिल्हयात अवकाळी पावसाचे पाणी शेतात साचल्याने कांदयाच्या वाफयात पाणी साचल्याने कांदा गर्भाशयातच वाळ खुंटली असुन रोपावर तुडतुडा, करपा आदी रोगांचा प्रादूर्भाव झाला आहे.
तालुका गारीपटीतून बचावला असला तरी रब्बी पिकाचे नुकसान करायचे असे जणू निसर्गाने ठरविले असावे या भितीने शेतकऱ्यांचा जीव कासावित होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा व गव्हाची शेती फुलविली त्यांचे या चार दिवसाच्या अवकाळी पाससात मुंग, उळीद, सोयाबीन आदीची कळया पाण्यात सापडल्या तर हरभरा गव्हाच्या गंजीमध्ये पाणी गेल्याने हरभऱ्यांना अंकूर फुटले असुन गहू काळसर पडला आहे. रब्बी पिकाचे अवकाळी पावसाने कंबरडे मोडले आहे.
खरीप हंगामात धान व इतर पिकांची झालेली नासाडी अजूनही शेतकरी विसरले नाहीत. शासनाच्या मदतीच्या नावावर मिळणारी तुटपंूजी रक्कम अजूनही अनेकापर्यंत पोहचलेली नाही. महिनाभरापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. खरीप हंगाम हातचा गेला.
रब्बी पिकाकडून आस लावून बसलेल्या तालूक्यातील शेतकऱ्यांचा जीव बदते हवामान पाहून टांगणीला लागत आहे. या वर्षाला चिचाळ परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादनाकडे शेतकरी वळला असला तरी निसर्गाची वक्रदृष्टी व कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे किंवा शासकीय गोदाम उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात व्यापाऱ्याला विकावा लागतो. व्यापारी हा कांदा दुप्पट, तिप्पट भावाने विकून नफा कमवित असतात. सध्या स्थितीत वातावरणात बदल झाल्याने व काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक पुन्हा संकटात सापडला आहे. शासनाने रब्बी पिकाची नुकसान भरपाई देण्याची मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Sudden rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.